
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दखल
85385
मुंबई ः विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास देताना शिक्षकेतर राज्य महामंडळाचे पदाधिकारी.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दखल
शिक्षणमंत्री दीपक केसरकर; समस्या मार्गी लावू, राज्य संघटना महामंडळाची मुंबईत सभा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २५ ः माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्य संघटना महामंडळ पदाधिकाऱ्यांना मुंबई येथे दिले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाची सहविचार सभा प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई येथे नुकतीच झाली.
यावेळी शिक्षणमंत्री केसरकर यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली. या सभेत शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव तुषार महाजन, अवर सचिव जयसिंग रासकर, राज्य शिक्षण मंडळ अध्यक्ष शरद गोसावी, शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे, शिक्षकेतर राज्य महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, गोवर्धन पांडुळे, राजू रणवीर, विनोद गोरे, भानुदास दळवी, इम्रान मुल्ला आदी महामंडळ पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सुधारीत आश्वासित प्रगती योजना, दहा, वीस, तीसची अंमलबजावणी, पूर्ण वेळ ग्रंथपालांची नियुक्ती, जुनी पेन्शन योजना लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीस मान्यता, आकृतीबंधाचा अहवाल, शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा अधिकार आदी विषयावर सविस्तर चर्चा झाली. या सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन यावेळी शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिले.
---
आंदोलन मागे घेण्याच्या सूचना
दरम्यान, दहावी व बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन मागे घ्यावे, अशी सूचना यावेळी शिक्षणमंत्री केसरकर यांनी केली. याबाबत सभेचे इतिवृत्त मिळाल्यानंतर राज्य महामंडळ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी सांगितले.