
आरोस हायस्कूलमध्ये सदिच्छा प्रदान कार्यक्रम
85421
आरोस ः सदिच्छा प्रदान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर.
आरोस हायस्कूलमध्ये
सदिच्छा प्रदान कार्यक्रम
सावंतवाडी ः आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा प्रदान समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांदा गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर (नामवंत कवी) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शरद शिरोडकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, स्वागत गीत, दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यांनतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्यावतीने शिक्षक, विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्था उपाध्यक्ष नीलेश परब, अर्जुन मुळीक, मुख्याध्यापक विद्याधर देसाई, शिक्षक लाडू सावंत, अनिल नाईक, समिधा मांजरेकर, देवयानी चव्हाण, श्रद्धा परब, प्राची परब, शिक्षकेतर कर्मचारी तानाजी खोत, लक्ष्मण शेळके, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तानाजी वरक यांनी सूत्रसंचालन केले.
--
पेन्शनसाठी ‘तहसीलदार आपल्यादारी’
जोगेश्वरी ः जेागेश्वरी पूर्वेच्या सेतू केंद्राअंतर्गत अस्तित्व फाऊंडेशनच्या मध्यमातून निराधारांच्या विविध पेन्शन योजनेसाठी ‘तहसीलदार आपल्या दारी’ या एकदिवसीय शिबिराचे अयोजन करण्यात आले होते. निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया इत्यादींना आर्थिक मदत वेळेवर करणे, हा या शिबिराचा मुख्य हेतू होता. महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पेन्शन योजनेचा लाभ विभागातील प्रत्येक लोकांना मिळावा, यासाठी शुक्रवारी (ता. २४) अस्तित्व फाऊंडेशनच्या माध्यमातून जोगेश्वरी पूर्वच्या स्वप्नपूर्ती, श्री गणेश मंदिर येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ५० पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेळी राज्यतील दुर्बल घटकांचे सामाजिक अन्यायापासून संरक्षण व्हावे, त्यांना आधार मिळावा, या हेतूने राज्य सरकारने ‘संजय गांधी निराधार योजना’ सुरू केली असून याचा लाभ विभागातील प्रत्येक लोकापर्यंत पोहचावा व योजनेची माहिती अधिक लोकापर्यंत याची जनजागृती व्हावी, यासाठी सेतू केंद्रामार्फत ही योजना राबवत असल्याचे तहसीलदार स्वाती पाटील यांनी या वेळी सांगितले; तर अस्तित्व फाऊंडेशनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी शासनाच्या पेन्शनसह इतर विविध योजनेची माहिती दिली. शिबिराचे आयोजन महा-ई-सेवा केंद्राचे संचालक नारायण सावंत व सायली सावंत यांनी केले होते.
---
रंगाऱ्यांची सुरक्षा पुन्हा वाऱ्यावर
मानखुर्द ः पालिकेच्या भोंगळ कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाच्या रंगरंगोटी करणाऱ्या रंगाऱ्यांची सुरक्षा पुन्हा रामभरोसे असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी याविषयी ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर रंगाऱ्यांना सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य देण्यात आले होते. मात्र आता पुन्हा त्या सुरक्षा साहित्याशिवाय रंगकाम करण्याची नामुष्की रंगाऱ्यांवर आल्याचे दिसत आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार व पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपूल रंगवणाऱ्या रंगाऱ्याच्या सुरक्षेसंदर्भात पालिकेकडून निष्काळजीपणा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यावेळी या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्याचा उद्देशाने ‘सकाळ’ने उड्डाणपूल रंगवणाऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीनंतर प्रशासन व कंत्राटदार जागे झाले व त्यांनी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या. दिवसरात्र वर्दळ सुरू असलेल्या रस्त्यालगत सुरू असलेल्या या कामात पुन्हा रंगाऱ्यांचे जीव धोक्यात घालून असुरक्षितपणे काम सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---
सुवर्णपदक विजेत्या आर्वीचा सत्कार
वडाळा ः नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेतील सब ज्युनियर गटामध्ये शिवडीतील वाघेश्वरी पूर्व येथे राहणाऱ्या आर्वी जाधव हिने सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल तिचे शिवडी विभागात कौतुक करण्यात येत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट शाखा क्र.२०२ चे शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २४) तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपशाखाप्रमुख उमेश नाईक, कांता राणे, संगीता घागरे, आर्वीचे वडील शिवस्वराज्य सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष, सल्लागार संजय जाधव व आई मेघा जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
---
घाटकोपरमध्ये बचत गटांना स्टॉल वाटप
घाटकोपर ः मुंबई महापालिका एन विभागातील नोंदणीकृत बचत गटांना केंद्राच्या विशेष योजनेअंतर्गत स्टॉलवाटप करण्यात आले. पालिकेच्या एन विभाग कार्यालयांतर्गत नोंदणीकृत असलेल्या पंचशील महिला बचत गटास शुक्रवारी (ता. २५) ‘एक स्थानक, एक उत्पादन’ या भारत सरकारच्या योजनेअंतर्गत घाटकोपर रेल्वे स्थानक येथे स्टॉल देण्यात आला. या वेळी महिलांनी उत्पादित केलेल्या इमिटेशन ज्वेलरी ठेवण्यात आली होती. याप्रसंगी एन विभागाच्या समाज विकास अधिकारी सरला राठोड, प्रशांत अभंग, स्टेशन प्रबंधक विद्याधर यादव आणि यशवंत लाकडे तसेच धनाजी देसाई हे उपस्थित होते.
--
पायोनियरच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
वडाळा ः माटुंगा येथील लायन्स पायोनियर हायस्कूल ट्रस्टतर्फे शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. दरम्यान पायोनियर हायस्कूलचे संचालक श्रीराम बापये, सेक्रेटरी नलावडे, शाळेचे माजी उप मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड, भीमराव माळी, माजी शिक्षिका एम. डी.बापट, एस.आय.डब्ल्यू.एस. हायस्कूलचे शिक्षक संजय सकपाळ आदी शिक्षकांचा तसेच शाळेचे माजी विद्यार्थी गांधी हॉस्पिटलचे प्रमुख सर्जन डॉ. गजानन भगत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात तीस वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र आले होते. जे आज डॉक्टर, वकील, पोलिस, उद्योजक, लेखक, पत्रकार, कवी अशा विविध क्षेत्रात दिग्गज आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. गजानन भगत, दत्ता जाधव, शिवाजी फणसेकर, गौतम जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली.
--
योगेश वायंगणकर यांची ‘भारत श्री’साठी निवड
मुलुंड ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे २० फेब्रुवारीला बांदेश्वर फिटनेस क्लबच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य मेन्स फिजिक व शरीसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये तब्बल १५० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. या मध्ये अंतिम विजेता म्हणून मुलुंडच्या संजीवनी जिम योगेश वायंगणकर यांनी बाजी मारली. या स्पर्धेमध्ये वायंगणकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आणि मुलुंडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यांची आता बिहारमधील पाटणा येथे होणाऱ्या भारत श्री व एशिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. योगेश यांनी या यशाचे श्रेय त्यांचे प्रशिक्षक प्रशांत नारकर आणि वसंत सालियन यांना दिले आहे.
--