रत्नागिरी- विज्ञानातून करिअर संधी

रत्नागिरी- विज्ञानातून करिअर संधी

फोटो ओळी
-rat२६p१.jpg- KOP२३L८५३७०
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे वेळोवेळी आकाश दर्शनाचे कार्यक्रम आयोजित करून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांना संधी दिली जाते.

विज्ञानातून करिअर संधी--भाग- २--लोगो

खगोलशास्त्रात करिअर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
मूलभूत संशोधनाच्या संधी ; विज्ञान, गणिताचा पाया हवा पक्का
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : गेल्या वीस वर्षांत खगोलशास्त्राकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढती आहे. दुर्बिणीतून तारे, तारका पाहताना आणि खगोलीय घटनांचा आढावा घेतानाच या विषयाची आवड लहान मुलांमध्ये निर्माण होते. त्यांचे हे ज्ञान वाढवताना त्यांना पुढील संधींविषयी माहिती दिली पाहिजे. भारतात डिपार्टमेंट ऑफ स्पेस आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या संस्थेत प्रचंड करिअर संधी आहेत. मूलभूत विज्ञानातील पदवी पदव्युत्तर पदवी प्राप्त करून सहाय्यक तंत्र सहाय्यक म्हणून इस्रो मध्ये प्रवेश करता येतो.तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी प्राप्त करून इस्रोमध्ये प्रवेश करता येतो.
खगोलविषयक संधींबाबत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. बाबासाहेब सुतार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गेल्या दशकभरात इस्रोने केलेल्या नेत्रदीपक प्रगतीमुळे सर्वसामान्यांमध्ये खगोल, अवकाश तंत्रज्ञान हा विषय चर्चिला जात आहे. शालेय अभ्यासक्रमातही खगोल, अवकाश तंत्रज्ञान यांचा चंचुप्रवेश झाला आहे. खगोलशास्त्राला करिअर म्हणून निवडताना पाय विज्ञान आणि गणित यांचा पाया पक्का करणे महत्त्वाचे आहे. उच्च माध्यमिक परीक्षेनंतर म्हणजे बारावीनंतर मूलभूत विज्ञानातील पदवुत्तर पदवी विशेषतः भौतिक, खगोलशास्त्र या विषयातील मिळवल्यानंतर डॉक्टरेटसाठी खगोलशास्त्र विषय निवडता येतो. या विषयात डॉक्टरेट मिळवून पुन्हा काही वर्षे एखाद्या संशोधन संस्थेत पुढील अभ्यास करून खगोलशास्त्रावरील संशोधन संस्थेत तसेच विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करता येते. हा पर्याय ज्यांना मूलभूत खगोलशास्त्रात, प्रायोगिक क्षेत्रात काम करावयाचे आहे अशांसाठी आहे. पाश्चात्य देशातील विद्यापीठांमध्ये खगोलशास्त्रामध्ये मूलभूत, प्रायोगिक संशोधन करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
खगोलशास्त्राची आवडीमुळेच येथील पद्मनाभ सरपोतदारने मुंबई विद्यापीठातून खगोलशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेऊन आता ते गुहागर महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांचे अलिकडील ग्रहण काळातील संशोधन, अवकाशीय धूळ या विषयातील संशोधन नामवंत विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. मुंबई विद्यापीठ रत्नागिरीत उपपरिसर केंद्राने खगोलशास्त्रावरील प्राथमिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमही विकसित केला आहे. त्याचा लाभ स्थानिक विद्यार्थ्यांना घेता येईल. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे खगोल अभ्यास केंद्र विविध खगोलीय घटनांविषयी सातत्याने जनजागृती करीत असते. हौशी खगोलप्रेमी आणि व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञ एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे जगभराचे अनेक हौशी खगोलप्रेमी जोडले गेले आहेत. त्यामुळे खगोलविज्ञानाचा सकारात्मक प्रचार प्रसार होत आहे, असे प्रा. सुतार यांनी सांगितले.
----------
चौकट १
इस्रोच्या १९ संस्था देशभरात कार्यरत आहेत. त्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या इंजिनिअरिंग शाखांची पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पदवी घेतलेले विद्यार्थी प्राथमिक स्तरावर संशोधक, तंत्र सहाय्यक म्हणून आवश्यक असतात. अवकाश विज्ञानात, उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात इस्रोने मारलेल्या देदीप्यमान भरारीमुळे वरील सर्व पदवीधर मंडळी इस्रोसाठी आवश्यक आहेत. डॉक्टरेट झालेल्या विद्यार्थ्यांनाही भारतभरात पसरलेल्या विविध दुर्बिणी, रेडिओ दुर्बिणी आणि खगोल वेधशाळा यांच्याकडे पुढील संशोधनासाठी संशोधन संधी आहेत. पुणे येथील आयुका ही खगोलविज्ञानाच्या अभ्यासाला वाहिलेली जगातील नामवंत संस्था आहे. तिथेही संशोधक म्हणून अल्पकाल तसेच दीर्घकाळ काम करता येते. अनेक विद्यापीठांत खगोलशास्त्र प्राध्यापक म्हणून खूपच संधी आहेत.
----------
चौकट २
स्टार्ट अपसाठी मोठी संधी
कोकणात अजूनही आकाश स्वच्छ आहे. खगोलशास्त्राचा एक भाग असलेल्या आकाश निरीक्षण छंदांची जोपासनाही करता येईल. वाढत्या पर्यटनस्थळी आकाश दर्शन कार्यक्रम करण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर स्टार्टअप् निर्मितीसाठी वाव आहे. भारतभरात अनेक ठिकाणी तारांगणे नव्याने निर्माण झाली आहेत. रत्नागिरीतही उत्तम तारांगण सुरू झाले आहे. खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास असणारे तज्ज्ञ मनुष्यबळ या तारांगणांसाठी उपयोगी ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com