
नांदगावासीयांचे ४ मार्चला ‘रेलरोको’
85488
नांदगाव ः येथील रेल्वे स्थानकात रेलरोको आंदोलासाठी आयोजित बैठकीत उपस्थित राजन तेली, संतोष कानडे, राजन चिके, संतोष राणे आदी.
नांदगावासीयांचे ४ मार्चला ‘रेलरोको’
बैठकीत निर्णय; ‘तुतारी’ एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत करण्यासाठी आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २६ ः येथील रेल्वे स्थानकातील ‘तुतारी’ एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात ४ मार्चला ‘रेलरोको’ आंदोलन करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. याबाबत स्थानिकांसह राजकीय नेतेमंडळींची बैठक येथील रेल्वेस्थानक येथे झाली. रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे जिल्हा दौऱ्यावर असताना हे आंदोलन केले जाणार आहे.
येथील रेल्वे स्थानकातील ‘तुतारी’ एक्स्प्रेसचा थांबा कोरोना काळात बंद करण्यात आला आहे. यामुळे देवगड, कणकवलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर परीसरातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर येथील स्थानिक रिक्षा व्यावसायिकांसह अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गाडीचा थांबा पूर्ववत व्हावा, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनास राजकीय नेते व स्थानिकांनी पत्रव्यवहार करूनही याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांसह राजकीय नेतेमंडळींची बैठक आज येथील रेल्वेस्थानक येथे झाली.
यावेळी वाघेरी माजी सरपंच संतोष राणे यांच्याकडे प्रशासकीय पत्रव्यवहार व नियोजन दिले असून संतोष कानडे यांनी रेल्वे प्रशासनाकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल न घेतल्याने बैठकीत नाराजी व्यक्त केली. जास्तीत जास्त नागरीकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याला सर्व उपस्थितांनी सर्वानुमते पाठींबा दिला. बाळा मोरये यांनीही आपली भूमिका मांडली.
बैठकी दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी स्थानिकांची भेट घेत माहिती घेतली. या बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, वाघेरी माजी सरपंच संतोष राणे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र उर्फ बाबू घाडी, बाळा मोरये, अरूण राणे, पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर, उपसरपंच संजय ढवण, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना अध्यक्ष प्रदिप घावरे, उपाध्यक्ष सूर्यकांत पांचाळ, सचिव गणेश गुरव, खजिनदार प्रदिप राणे, सहखजिनदार रविंद्र सावंत यांच्यासह वाघेरी-मठ खुर्द, पियाळी, तोंडवलीती नागरीक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बैठकीदरम्यान पोलिस बंदोबस्त होता.
--
केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधणार
४ मार्चला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री वैभववाडी रेल्वे फाटक येथे अंडरपासचे भूमिपूजन करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे याच दिवशी नांदगाव रेल्वेस्टेशन येथे ‘रेल रोको’ करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करणार असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले.