
पान एक-केसरकरांना मातोश्रीवर नेल्याला पश्चाताप
पान एक
८५५००
केसरकरांना मातोश्रीवर नेल्याचा पश्चाताप
सुभाष देसाई ः सावंतवाडीतील मेळाव्यात केली टीका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः शिवसेनेत काम करताना आजपर्यंत अनेकांना मातोश्रीवर घेऊन गेलो. मात्र, त्यापैकी दीपक केसरकर यांना मातोश्रीवर घेऊन गेलो याचा आपल्याला आज पश्चाताप होत आहे. राणेंच्या दहशतवादाविरुद्ध शेवटपर्यंत लढणार, असे सांगणारे केसरकरच आज त्यांच्या मांडीवर जाऊन बसले, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आज येथे केली. केसरकर यांची पुढची उडी ही भाजपत असणार आहे. मात्र, भाजप त्यांचा वापर करून कुठल्या कुठे फेकून देणार हे त्यांनाही समजणार नाही, असेही श्री. देसाई म्हणाले. येथील आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.
श्री. देसाई म्हणाले, ‘दगा फटक्याने आमचे सरकार घालवले. त्यामध्ये आम्ही निवडून दिलेलेच ४० आमदार होते आणि त्यामध्ये केसरकर होते, हे मोठे दुर्दैव. आज त्यांची अवस्था शोले पिक्चरमधील जेलरप्रमाणे झाली आहे. अर्धे इकडे, अर्धे तिकडे. मागे मात्र कोणीच नाही. त्यामुळे सावंतवाडीत सभा घ्यायची त्यांची हिंमत होत नाही. शिवसेनेत येताना सिंधुदुर्गातील ज्या दहशतवादाची ते भाषा करत होते, त्याच राणेंच्या मांडीवर जाऊन बसण्याची वेळ आज त्यांच्यावर आली आहे. उद्या राणेंना निवडून द्या, असा जोगवा मागण्याची वेळही त्यांच्यावर येणार. मग यांचा दहशतवाद कुठे जाणार?
ते म्हणाले, ‘शिवसेना ही रोपटं असल्यापासून गेली ५७ वर्ष मी निष्ठेने आणि अभिमानाने काम केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आणि आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केले. यापुढे सुद्धा जीवात जीव असेपर्यंत शिवसेनेचे गेलेले वैभव पुन्हा मिळाल्याशिवाय डोळे मिटणार नाही. मला विश्वास आहे की कडवट शिवसैनिकांच्या जोरावर गेलेले शिवसेनेचे वैभव पुन्हा मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्या पदासाठी तुम्ही शिवसेनेशी विश्वासघात केला ते मागण्याची हिंमत तुमच्यात नव्हती. म्हणूनच तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला पळालात. आज जरी तुम्ही शिवसेना हे नाव आणि चिन्ह चोरले असले तरी आम्ही तीळ मात्र हललो नाही. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईपर्यंत, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत.’’
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, बाळा गावडे, अतुल रावराणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरी समन्वयक प्रदीप बोरकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, मंदार शिरसाठ, सागर नाणोसकर, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते. मेळाव्यामध्ये शिवसैनिकांची लक्षणीय गर्दी होती.