तंत्रज्ञानही हृदयस्थ

तंत्रज्ञानही हृदयस्थ

rat२७१२.txt

बातमी क्र. १२ ( टुडे पान ३ )

(२१ फेब्रुवारी पान दोन)

टेक्नोवर्ल्ड ...

rat२७p२.jpg -
85545
प्रा.संतोष गोणबरे


हृदयाचा विकार जडणं, ही बाब सध्या सार्वत्रिक झाली आहे. काही काळ आधी हा विकार पन्नाशीच्या पुढील व्यक्तींमध्ये दिसून यायचा, मात्र आता तरुण पिढीला देखील या विकाराने विळखा घातलेला दिसत आहे. बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण नसणे, बैठी जीवनशैली, वाढता ताण-तणाव आणि मानसिक आरोग्य या सर्व गोष्टी यात भर घालत आहेत. मद्यपान आणि धुम्रपान ही कारणे तर आहेतच पण सध्याच्या वर्क फ्रॉम होमच्या काळात शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत आणि प्रत्येक गाव शहराचे लघुरूप बनत चालल्याने कमी झालेले कष्टप्रद काम दुष्परिणामांमध्ये भर घालत आहे. आपण जे नवे-नवे तंत्रज्ञान नित्याच्या वापरात उपयोगात आणतो, त्यातून काही चांगले तर काही वाईट घडणं, हे क्रमप्राप्तच म्हणायला हवे. हृदयाची लय आणि संरचनेत अनियमितता असेल तर ती शोधण्यासही तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य ठरतो .

प्रा.संतोष गोणबरे,चिपळूण
--
तंत्रज्ञानही हृदयस्थ

हृदय शरिराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना ‘हृदय धमन्या’ म्हणजेच कोरोनरी आर्टरी म्हणतात. जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही, यालाच हृदयविकार म्हणतात. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकार (कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज); ज्यामध्ये रक्तवाहिन्या, हृदय, हृदयाचे ठोके इत्यादींचा समावेश असतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्‍या तीन मुख्य रक्तवाहिन्यांपैकी कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होतो. कधी-कधी तर छातीत दुखण्यामुळे अचानक मृत्यू झाला, अशीही उदाहरणे पाहण्यास मिळतात. वैद्यकीय भाषेत याला ‘कार्डियक अरेस्ट’ म्हणतात. एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक कार्य करणे थांबवते आणि योग्य उपचार न मिळाल्यास तासाभरात त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आपण जसजसे मोठे होत जातो, तशा शरिराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून कोलेस्ट्रॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. कारण महिलांमध्ये सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे पाळी जाण्याच्या कालावधीपर्यंत म्हणजे मिनोपॉजपर्यंत रक्ताभिसरण जास्त होत राहते. हृदयाच्या रोहिणीमध्ये अडथळा तयार होणे (कोरोनरी थांब्रोसीस), रक्ताभिसरणाच्या क्रियेची लय मंदावणे (अंजायना पेक्टोरीस), हृदयाच्या कार्यात अवरोध (हार्ट ब्लॉक), गती अनियमितता (ब्रॅडी कार्डिया), आकार वाढणे (हायपर ट्रॉफी), आसपास काही द्रव पदार्थ जमा होणे (पेरी कार्डीअल इन्फुजन), हृदय जिथे संरक्षित आहे त्या जागेचा आकार वाढणे (कार्डियाक डायलेटेशन) असे अनेक प्रकारचे हृदय रोग वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण होतात. धूम्रपान, मधूमेह, उच्च रक्तदाब, अती लठ्ठपणा, कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल, शारिरीक श्रमाची कमतरता, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा, चिंता इत्यादी अनेक कारणे हृद्य विकाराचे आमंत्रण देतात. छातीच्या मध्यभागी तीव्र वेदना, श्वसनास त्रास, घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे, छातीच्या वेदना पाठीच्या मणक्यापर्यंत जाणे, काही वेळा रुग्ण पांढरा पडणे अशी लक्षणे दिसली की समजावं की हृदय कर्तव्यात चुकारपणा करत आहे.
मानवी हृदयामध्ये चार झडपा असतात. डाव्या बाजूला ऐरोटिक आणि मिट्रल अशा दोन आणि उजव्या बाजूला पल्मिनरी आणि ट्रिक्युसाईड अशा दोन झडपा असतात; ज्या सर्वसाधारणपणे फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे कोमल असतात. हृदयातील रक्ताचा प्रवाह एकाच दिशेने मार्गस्थ करणे हे त्यांचे मुख्य कार्य असते. शरीरातील अशुद्ध रक्त हृदयाच्या उजव्या बाजूच्या वरील कप्प्यामध्ये एकत्रित जमा होते. ते नंतर उजव्या बाजूच्या खालील पंपिंग चेंबरमध्ये ढकलले जाते. तिथून ते फुप्फुसामध्ये जाते आणि तेथे त्यात ऑक्सिजन मिसळला जाऊन ते शुद्ध होते. हे शुद्ध रक्त डाव्या बाजूच्या वरील कप्प्यामध्ये जमा होते. तिथून ते डाव्या बाजूच्या खालील पंपिंग चेंबरमध्ये येऊन महारोहिणीद्वारे संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित केले जाते. या झडपांना काही विकार झाल्यास ही रक्तप्रवाहाची साखळी बाधित होऊन हृदयावरती अतिरिक्त ताण येऊन ते निकामी होण्याचा धोका संभवतो.
इलेक्ट्रोकार्डिओग्राम ज्याला आपण ईसीजी म्हणतो ती एक विद्युत सिग्नल रेकॉर्ड करण्याची पध्दत असते ज्यातून आपल्या हृदयाची लय आणि संरचनेत अनियमितता असेल तर शोधण्यास मदत होते. हॉल्टर मॉनिटरींग अशी एक पोर्टेबल डिव्हाइस आहे जिच्या मदतीने सतत ईसीजी रेकॉर्ड करून २४x७ मॉनिटरिंग करता येते. इकोकार्डिओग्राम ही डॉपलर तत्वावर चालणारी मशीन छातीचा अल्ट्रासाऊंड प्रतिध्वनी मोजून संगणकावर तपशीलवार प्रतिमा दर्शविते व धमन्यांची अवस्था विशद करते. ह्रदयाची कॅथेटरिझेशन करता येते. ही प्रक्रिया ब्लॉक केलेल्या हृदयाच्या धमन्या साफ करते. पर्क्यूटेनियस कोरोनरी इंटरव्हेंशन (पीसीआय) हे त्याचे दुसरे नाव आहे. या चाचणीत, आपल्या पायाच्या मांडीच्या सांध्यात एक शिरा किंवा धमनी पकडून लहान ट्यूब (म्यान) घातली जाते. नंतर एक पोकळ, लवचिक आणि लांब ट्यूब (मार्गदर्शक कॅथेटर) म्यानमध्ये घातली जाते. मॉनिटरवरील एक्स-रे प्रतिमांसह हृदयाच्या जवळपास पोचत कॅथेटरला योग्य मार्गदर्शन करत हृदयातील झडपेपर्यंत पोहोचून एका फुग्याच्या मदतीने ती झडप फुगवून मोठी केली जाते. कार्डियाक टोमोग्राफी ही सीटीस्कॅन सारखीच प्रतिमा गोळा करण्याचे काम करते. कार्डियाक मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग ज्याला आपण एमआरआय म्हणतो त्या चाचणीत चुंबकीय क्षेत्र तयार करणाऱ्या लांब ट्यूबसारख्या मशीनमधून हृदयाचे संपूर्ण मूल्यांकन करता येते. अँजिओप्लास्टी आता सर्वांना माहिती झाली आहे. यात एक लहान जाळीची नळी (स्टेंट) धमनीत टाकली जाऊ शकते. स्टेंट धमनी उघडी ठेवण्यास मदत करते. काही स्टेंटमध्ये रक्तवाहिन्या खुल्या ठेवणारे औषध असते. कित्येक वेळा धमन्यांतील अडथळे दूर करण्यासाठी कोरोनरी अँजियोप्लास्टी करतात. कधी ओपन हार्ट सर्जरी करण्याची वेळ आलीच तर हृदय उघडे करून क्लोज्ड मायट्रल व्हॉल्व्होटॉमी, व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट, तावी अशा आधुनिक तंत्रज्ञानाने प्रेरित शस्त्रक्रिया केल्या जातात.
हृदय विकार फक्त एकल आणि ठराविक नसतो. त्या-त्या विकाराच्या अनुषंगाने हृदय आपल्याशी असहकार पुकारते. मात्र योग्य आहार, पुरेशी झोप, कमी तणाव आणि शरीर संतुलित राहील असा व्यायाम, याद्वारे आपण हृद्य जिंकू शकतो. २००२ मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार १२.५% मृत्यू दरवर्षी हृदयाघातने होतात. भारतात २००७ साली ३२% मृत्यू हे हृदयाघातामुळे झाले होते. खरं तर प्रेमात हृदय तुटण्यापेक्षा हे प्रमाण कितीतरी अधिक आहे !

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com