तृणधान्य पीक योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृणधान्य पीक योजना
तृणधान्य पीक योजना

तृणधान्य पीक योजना

sakal_logo
By

माहितीचा कोपरा

85554
विनोद दळवी

तृणधान्य पीक योजना


लीड
नाचणी उत्पादन अलीकडे कमी झाले आहे; परंतु नाचणी हे महत्त्वाचे आणि मानवी शरीराला पौष्टिक पुरविणारे तृणधान्य आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाचणी उत्पादन मोठ्या प्रमाणात घ्यावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेने वाढीव उपकरातील उत्पन्नातून शेतकऱ्यांना तृणधान्य पीक लागवडीसाठी ७५ टक्के अनुदानावर रब्बी उन्हाळी हंगामात नाचणी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रती शेतकरी ०-०५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत अनुदान देण्याची योजना आणली आहे.
- विनोद दळवी

काय आहे योजना?
जिल्हा परिषद विविध अभियानांत राज्यात ज्याप्रकारे आघाडीवर आहे, त्याप्रमाणे विकासकामांत सुद्धा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजना राबवून अनुदान देण्याच्या योजना सुद्धा जिल्हा परिषद राबवित असते. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे तृणधान्य पीक योजना आहे. रब्बी उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादन वाढविण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून ही योजना राबविण्यात येत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी एकूण ५ लाख ९७ हजार ८७० रुपये एवढी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी यातून जिल्ह्यातील २१९ नाचणी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

अर्ज कोठे करावा?
तृणधान्य पीक लागवडीसाठी ७५ टक्के अनुदानाचा लाभ घेण्याकरिता नाचणी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समितीकडे रीतसर मागणी करणारा अर्ज करायचा आहे. यासाठी पंचायत समितीत छापील अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक शेतकऱ्याचा अर्ज पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेत प्राप्त होणे क्रमप्राप्त आहे.

अट शिथिल
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्याचे शिफारस पत्र बंधनकारक असते; मात्र सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक राजवट आहे. त्यामुळे यावर्षी ही अट शिथिल झालेली आहे. शेतकरी थेट या लाभासाठी पंचायत समितीकडे अर्ज करू शकतो.

आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, बचतगट किंवा शेतकरी गट घेऊ शकतात. वैयक्तिक शेतकरी असल्यास त्याच्या नावे सातबारा असणे अनिवार्य आहे. बचतगट किंवा शेतकरी गट असल्यास बचतगटातील किंवा शेतकरी गटातील समाविष्ट सदस्यांपैकी किमान एका सदस्याच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे. महिला बचतगट असल्यास बचतगटातील सामाविष्ट महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे.

... तरच मिळणार अनुदान
लाभार्थी शेतकरी, बचतगट, शेतकरी गट यांना देण्यात येणारे अर्थसाहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. अर्थसाहाय्य लाभ मिळण्यासाठी लाभार्थींना किमान ०-०५-० हेक्टर प्रक्षेत्रावर नागली पीक लागवड करणे बंधनकारक आहे. तरच प्रति शेतकरी ०-०५-५ एवढ्या क्षेत्रासाठी अनुदानाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. लाभासाठी रब्बी उन्हाळी हंगामात नाचणी पीक घेणे गरजेचे आहे. लागवडीचे क्षेत्र सामायिक असल्यास लागवड क्षेत्राचे हमीपत्र देणे बंधनकारक आहे. कुटुंब मर्यादित असल्याचे घोषणापत्र आवश्यक आहे.

आर्थिक तरतूद
२०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेने तृणधान्य पीक लागवड अंतर्गत रब्बी उन्हाळी हंगाम नाचणी लागवडीसाठी ५ लाख ९७ हजार ८७० रुपये एवढी आर्थिक तरतूद केली आहे. यासाठी २१९ लाभार्थी निवडले जाणार असून एकूण १०-९५ हेक्टर क्षेत्रासाठी हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यामधून देवगड, वैभववाडी, कणकवली, दोडामार्ग, वेंगुर्ले या पाच तालुक्यांना प्रत्येकी २७ लाभार्थी, १-३५ हेक्टर, ७३ हजार ७१० रुपये असे लक्षांश देण्यात आले आहे. कुडाळ, सावंतवाडी आणि मालवण या तीन तालुक्यांना २८ लाभार्थी, १-४० हेक्टर, ७६ हजार ४४० रुपये एवढे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

प्रस्तावांसाठी आवाहन
तालुका पंचायत समितीतील कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी यांनी या योजनेचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत. २ मार्चपर्यंत लाभार्थी यादी मंजुरीसाठी पाठवावी, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी यांनी केले आहे.
.................
कोट
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला यांच्या उन्नतीसाठी झटणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने तृणधान्य विकास पीक लागवडीसाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येत आहे. नाचणी पिकाची यासाठी निवड करण्यात आली आहे. याचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांनी नाचणी पिकाचे उत्पादन वाढवावे.
- विरेश अंधारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी