
संभाव्य वीज दरवाढीबाबत ग्राहक संघटना लक्ष वेधणार
संभाव्य वीज दरवाढीबाबत
ग्राहक संघटना लक्ष वेधणार
कुडाळ, ता. २७ ः राज्यात प्रस्तावित वीज दरवाढीसंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या (ता. २८) सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महावितरण कंपनी आणि तहसीलदार यांना वीज दरवाढीविरोधात निवेदन देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीने ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला असून या विरोधात राज्याचे वीज ग्राहक संघटना अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष काकडे यांनी दिली. संभाव्य वीज दरवाढ मोडून काढण्यासाठी तसेच ग्राहकांच्या तक्रारींबाबत महावितरण कंपनीला निवेदन देण्यात येईल. यावेळी अधिकाधिक वीज ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेकडून करण्यात आले. याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेस वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष काकडे, उपाध्यक्ष श्रीराम शिरसाट, सचिव निखिल नाईक, जिल्हा उपाध्यक्ष नितीन म्हापणकर, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, सल्लागार द्वारकानाथ घुर्ये आदी उपस्थित होते.