संयम, हुशारीमुळेच स्वराज्य निर्मिती

संयम, हुशारीमुळेच स्वराज्य निर्मिती

85557
सावंतवाडी ः ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ व्याख्यानात बोलताना शिवचरित्रकार शिवरत्न शेट्ये.
85558
सावंतवाडी ः व्याख्यानादरम्यान झालेली गर्दी.


संयम, हुशारीमुळेच स्वराज्य निर्मिती

डॉ. शिवरत्न शेट्ये; सावंतवाडीत उलघडला ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’

सावंतवाडी, ता. २७ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही इमानदारांसह लबाडही होते. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले; परंतु अशा लोकांना सोबत घेऊन स्वातंत्र्य निर्माण करणे हे महाराजांचे मोठेपण म्हणावे लागेल. छत्रपती संयमी आणि हुशार असल्यामुळेच स्वराज्य निर्माण होऊ शकले. कारण त्यावेळी वतनापेक्षा इमानदारीला महत्त्व होते, असे मत शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवरत्न शेट्ये यांनी येथे व्यक्त केले. आतासारख्या नोटिसा पाठविणे, चौकश्या लावणे हे सर्व प्रकार त्यावेळी सुध्दा होते; मात्र महाराजांना मानणारे मावळे फुटले नाहीत. त्यांनी आपल्याला काय मिळेल, यापेक्षा स्वामीनिष्ठा महत्त्वाची मानली. त्याचाच परिपाक म्हणून महाराजांचे मावळे इतिहास रचू शकले, असेही ते म्हणाले.
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजागराच्या निमित्ताने येथील राजवाड्यात आयोजित ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ या विषयावर श्री. शेट्ये यांनी काल (ता. २६) सहावे पुष्प गुंफले. यावेळी श्रीमंत राजे खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखम सावंत-भोसले, भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, डॉ. प्रवीण ठाकरे, डॉ. उदय नाईक, ॲड. शामराव सावंत, इतिहास तज्ज्ञ डॉ. जी. ए. बुवा, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक वाय. पी. नाईक, डॉ. विशाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी सैनिक धोंडी पास्ते, रामचंद्र सावंत, विनायक बागायतकर, कराटे प्रशिक्षक वसंत जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
इतिहासकार श्री. शेट्ये म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांचे अतुलनीय शौर्य, विलक्षण बुद्धिचातुर्य, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि गनिमी कावा या साऱ्यांची जगाला प्रचिती देणारे युद्ध म्हणजे ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ होय. अफाट फौजेनिशी आलेल्या अफजलखानाला मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याने प्रतापगडावरच संपविले. यामागे छत्रपती शिवरायांची अलौकिक बौद्धिक क्षमता तर होतीच, शिवाय त्यांच्याजवळ असलेले त्यांचे विशेष वकील पंतोजी गोपीनाथ बोकील यांची प्रसंगावधानता, कूटनीती आणि गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची मुत्सद्देगिरी देखील महत्त्वपूर्ण व निर्णायक ठरली. १० नोव्हेंबर १६५९ मध्ये दुपारी दीड वाजता छत्रपती शिवराय व अफजल खान यांची झालेली भेट आणि त्यानंतर अफजलखानाने गमावलेला प्राण ही घटना मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. या घटनेमुळे मराठ्यांना त्यांच्या पराक्रमाची जाणीव झालीच; शिवाय छत्रपती शिवरायांच्या शौर्याची गाथा अफगाणिस्तान, तुर्कस्तान, सौदी अरेबिया, इंग्लंड अशा अनेक देशांपर्यंत पोहोचली. म्हणूनच प्रतापगडाचा रणसंग्राम केवळ अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणे एवढीच मर्यादित घटना नाही, तर जगातील सर्वोत्तम युद्धांपैकी एक आहे, असे इतिहासकार सेतू माधव पगडी लिहितात’’ आपल्या व्याख्यानातून शिवरत्न शेट्ये यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या अंगी असलेल्या मातृत्व, दातृत्व, नेतृत्व, धैर्य व प्रसंगावधान अशा गुणांचा परिचय करून दिला. महाराजांच्या अंगी असलेल्या मानसशास्त्रीय कौशल्यांचा परिचय सुद्धा आपल्या व्याख्यानातून त्यांनी करून दिला.
ते पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांनी आपल्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात जीवाला जीव देणारे सवंगडी, मित्र व मावळे तयार केले. म्हणूनच ‘स्वराज्य’ उभे राहू शकले. स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला करून कोंढाणा घेण्यासाठी जीवाचे बलिदान देणारे तानाजी मालुसरे, सिद्धी जोहरशी प्राणपणाने लढणारे शिवा काशीद, फक्त ३०० मावळ्यांना घेऊन घोडखिंड लढविणारे बाजीप्रभू देशपांडे, महाराजांसाठी स्वतःचे प्राण सदैव वेचण्यासाठी तयार असलेले जिवाजी महाले, हिरोजी इंदुलकर, येसाजी कंक, कोंडाजी फर्जंद असे कितीतरी निष्ठावान मावळे महाराजांनी तयार केले. म्हणूनच छत्रपती शिवराय हे केवळ पन्नास वर्षांच्या आयुष्यात शेकडो गड, किल्ले जिंकून स्वराज्य उभे करू शकले. अलीकडे स्वार्थासाठी निष्ठा विसरून गेलेले राज्यकर्ते निर्माण झाले आणि म्हणूनच स्वराज्याचे ‘सुराज्य’ होऊ शकले नाही.’’
डॉ. राहुल गव्हाणकर यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका सीमा पंडित यांनी सूत्रसंचालन केले. अँड्र्यू फर्नांडिस यांनी आभार मानले.
...............
चौकट
इतिहासाचे विकृतीकरण थांबवणे गरजेचे
डॉ. शेट्ये म्हणाले, ‘‘आपल्याला अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते, असे सांगण्यात येते; मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. शिवरायांचा आरमार प्रमुख दौलत खान होता. महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांची सुटका करण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत करणारा मदारी मेहतर, शिवरायांचे वकील काझी हैदर व शिवरायांचे चित्र रेखाटणारा थोर चित्रकार मीर मोहम्मद हे सर्वच मुस्लिम समाजाचे होते; मात्र स्वराज्यासाठी ते छत्रपती शिवरायांबरोबर ‘मराठे मावळे’ म्हणून लढले. म्हणून आपण छत्रपती शिवरायांची सर्वधर्मसमभाव वृत्ती व छत्रपती शिवरायांचा दूरदृष्टीकोन जाणून इतिहासाचे विकृतीकरण थांबवले पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com