
शास्त्री, सोनवीतील गाळ उपशाचे काम संथगतीने
rat२७३.txt
बातमी क्र. ३ (टुडे पान १ साठी)
फोटो ओळी
-२७p१८.jpg-
८५५८१
संगमेश्वर ः सोनवी नदीतील सुरू असलेला गाळ उपसा.
--
शास्त्री, सोनवीतील गाळ उपशाचे काम संथगतीने
ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप ; माभळेतील गाळ उपसा सुरू करण्याची मागणी
संगमेश्वर, ता. २७ ः संगमेश्वर तालुक्यातून वाहणाऱ्या शास्त्री आणि सोनवी नदीतील गाळ उपशाचे काम सुरू आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने आणि गाळ उपशावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने गाळ उपसा करूनही पुराची समस्या तशीच राहणार अशी भिती संगमेश्वरवासीयांनी व्यक्त केली आहे.
जलसंपदा विभागाच्या वतीने शास्त्री आणि सोनवी नदीतील गाळ काढण्यात येत आहे. सध्या रामपेठ, मापारी मोहल्लाच्या समोरील नदी पात्रामध्ये सात फूट खोल असा सर्व समांतर गाळ काढण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. तसेच दुसरी टीम मारूती मंदिर, माभळे आणि सोनवी पुलाच्या वरच्या बाजूलाही गाळ उपसा करत आहेत. नदीतील गाळ आठवडा बाजारातील मैदानात टाकण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गाळ उपसा करून नदीच्या बाजूला टाकण्यात येत आहे. मात्र हा गाळ पुन्हा नदीमध्ये येणार आहे. डंपरने कमी गाळ लोड करून काही ठिकाणी वेळकाढूपणा केला जात होता. हे जागृत ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर त्यांचे फोटो आणि व्हीडीओ काढून संबंधित कार्यालयात पाठवण्यात आले. त्यानंतर सर्व यंत्रणा जागी झाली. उपसा करणारे ऑपरेटर आणि वाहनधारकांना दबाव आल्यावर आता काम योग्य पद्धतीने चालू झाले. डंपर पूर्ण भरून आणून टाकायला सुरवात झाली आहे. या कामावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
हा गाळ उपसा घडशी यांचे गणेश हॉटेल आणि सरकारी गोडावून समोरच्या नदी पात्रामध्ये झाला तर पुराचा धोका टळू शकतो. कारण त्या ठिकाणी नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणावर वाळू, खडी, माती, वाहून येऊन मोठ्या भाट्या तयार झाल्या आहेत. आता त्यामध्ये झाडेझुडपे वाढून नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करत असल्याने खळखळ वाहणारे पाणी मागच्या मागे थांबून रहाते आणि संगमेश्वरला पुराचा फटका बसतो. शास्त्री आणि सोनवी ज्या ठिकाणी एकत्र येतात ते पात्र जर मोठे करून पुढील बाजूच्या भाट्या मोकळ्या केल्या तर पाण्याचा निचरा जलद गतीने होवून संगमेश्वरचा पुराचा धोका टळू शकतो.
---
कोंडअसुर्डेतही उपाययोजना हव्यात
कोंडअसुर्डे नदीच्या बाजूने शेत जमिनीची धुप होत आहे. तिथेही उपसलेला गाळ टाकून भर केल्यास शेतजमीन वाचेल. कोंडअसुर्डे गावालाही पुराचा धोका कमी जाणवेल. कोंडअसुर्डे येथे दादा मुळ्ये यांच्या घराशेजारी वाहणारा ओढाही वाळू, खडीने भरून गेला आहे. तो साफ करणे गरजेचे आहे. त्या ओढ्यातून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहते आणि पुढे नदीला अडथळा निर्माण करते. जर त्याचा प्रवाह थोडा बदलला तर नदी प्रवाहाला अडथळा कमी जाणवेल.