
अणाव घाटचे पेड पुलकाम अर्धवट
85681
अणाव ः घाटचे पेड पुलाच्या अर्धवट कामाबाबत अधिकारी, ठेकेदाराला जाब विचारताना माजी खासदार नीलेश राणे.
अणाव घाटचे पेड पुलाचे काम अर्धवट
नीलेश राणे आक्रमक; अधिकारी, ठेकेदार धारेवर
कुडाळ, ता. २७ ः अणाव घाटचे पेड (ता.कुडाळ) पुलाचे अर्धवट काम मेपर्यंत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करा; अन्यथा आमच्या पद्धतीने काम पूर्ण करू, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. माजी खासदार राणे यांनी आज पुलाची पाहणी केली. यावेळी स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अणाव घाटचे पेड पुलाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. या अर्धवट कामामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या अपूर्णावस्थेतील पुलाची पाहणी माजी खासदार राणेंनी आज केली. यावेळी सार्वजनिक बांधकामचे अधिकारी तसेच ठेकेदार उपस्थित होते. पुलाच्या अपूर्ण कामाबाबत राणे यांनी बांधकामचे अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरले. पाच वर्षे होऊनही पुलाचे काम पूर्ण का होत नाही, असा सवाल करत ग्रामस्थांची हेळसांड थांबली पाहिजे. अर्धवट अवस्थेतील पुलामुळे शाळकरी मुलांना पाच किलोमीटर पायपीट करून शाळेत जावे लागते, याबाबत नाराजी व्यक्त केली. पुलाचे काम कधी पूर्ण होणार, ते लेखी स्वरुपात द्या. त्या कालावधीत काम पूर्ण न झाल्यास आमच्या पद्धतीने ते पूर्ण करू, असा इशारा दिला. स्थानिक ग्रामस्थांनीही आपल्या व्यथा मांडताना ठेकेदार आणि बांधकाम अधिकाऱ्यांच्या मनमानीचा पाढा वाचला. यावेळी पुलाचे काम मेपर्यंत पुलाचे काम पूर्णत्वास जाईल, असे अधिकारी, ठेकेदार यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष दादा साईल, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, विनायक अणावकर, नारायण गावडे, श्री. कांदळगावकर, भाजपचे कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, भाजप नगरपंचायत गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभी गावडे, बाव माजी सरपंच नागेश परब आदी उपस्थित होते.