वेतकाठी तोडीमध्ये लाखोंचा ‘गोलमाल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेतकाठी तोडीमध्ये
लाखोंचा ‘गोलमाल’
वेतकाठी तोडीमध्ये लाखोंचा ‘गोलमाल’

वेतकाठी तोडीमध्ये लाखोंचा ‘गोलमाल’

sakal_logo
By

वेतकाठी तोडीमध्ये
लाखोंचा ‘गोलमाल’

मालकी क्षेत्राचे नाव; शासनाचा महसूल पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः जिल्ह्यात मालकी क्षेत्राच्या नावाखाली लगतच्या वनक्षेत्रातील लाखो रूपयांची वेतकाठी तोडली जात असून वनविभागातील काही झारीतील शुक्राचार्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून मालकी प्रकरणे दाखवून वनसंज्ञेतील वेतकाठीची तोड करत आहेत. यातून वनविभागाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत असून तो अधिकाऱ्याच्या घशात जात आहे. याबाबत उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी जर सर्व मालकी प्रकरणाची पडताळणी केल्यास लाखो रूपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येणार आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनहद्द असल्याने या जमिनीमध्ये वेतकाठी, शिकेकाई, तमालपत्री अशी वेगवेगळी उत्पादने येतात. या सर्व उत्पादनांना बाजारात मोठी मागणी असून दरवर्षी ही उत्पादने वनविभाग निविदा पध्दतीने देत असतात. तशी वेतकाठी ही दोन किंवा तीन वर्षानी निविदा पध्दतीने दिली जाते. यातील अनेक मक्ते हे सोसायटींनाही दिले जात असतात. या माध्यमातून वनविभागाला लाखो रूपयांचा महसूल प्राप्त होत असतो.
गेल्या अनेक वर्षांपासून असे मक्ते सोसायटींना दिले गेले असतनाच आता मात्र वनविभागातील काही झारीतील शुक्राचार्य जागे झाले असून नव्या उपवनसंरक्षक यांना अंधारात ठेवून वेतकाठीची काही मालकी प्रकरणे तयार केली असून यातील अनेक मालकी प्रकरणे ही दोडामार्ग व कुडाळ तालुक्यात करण्यात आली आहेत. यात एखाद्या वनहद्दी जवळील मालकी प्रकरण करायचे आणि वनहद्दीतील सर्व वेतकाठीसह अन्य झाडे साफ करायची असाच काहिसा प्रकार सुरू करण्यात आला आहे. यामध्ये तर कुडाळ तालुक्यातील शिवापूरसह अन्य गावांबरोबर दोडामार्ग तालुक्यातील आवाडेपासून पाल, पाट्ये, शिरंगे भागातही वेतकाठीची तोड करण्यात आली आहे. सध्या उपवनसंरक्षक उपवनसंरक्षक हे नव्याने रूजू झाल्याने त्यांना अंधारात ठेवून हे सर्व प्रकार काही अधिकारी करत असल्याची चर्चा वनविभागातच सुरू असून उपवनसंरक्षक यांना काही अधिकारी गोड बोलून चुकीचे मार्गदर्शन करत असल्याचेही सांगितले जात आहे. वेतकाठीतून शासनाला मिळणारा लाखो रूपयांचा महसूल परस्पर अधिकारी लाटत असले तर विचारणार कोणाला? असा सवाल वन्यप्रेमी व्यक्त करीत आहेत.
----------
चौकट
नावाला धाडी
वनविभागातील काही अधिकाऱ्यांनी मागील वर्षी काही ठिकाणी अनधिकृत वेतकाठी तोड होत असल्याने धाडी टाकून वेतकाठी पकडली. मात्र, काही दिवसांनी ही वेतकाठी सोडून देण्यात आली. याची चर्चाही सध्या वनविभागात सुरू असून दोडामार्ग तालुक्यातील आवाडे येथे वेतकाठी पकडल्याचेही बोलले जात आहे.
----------
कोट
वेतकाठी तोड होत असल्यास अधिकारी वर्गाकडून खात्री केली जाईल. कुठल्याही अनधिकृत प्रकारांना खतपाणी घातले जाणार नाही. अधिकृत माहिती मिळाल्यास मी स्वतःच कारवाईचे पाऊल उचलणार आहे.
- एस. नवकिशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, सावंतवाडी