
मनाला भिडणारी कविता लिहणे गरजेचे
85836
सावंतवाडी ः येथे मराठी भाषा दिन आणि जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलनचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना अनंत वैद्य. बाजूला मंगेश मस्के, अॅड. संतोष सावंत, विठ्ठल कदम आदी. (छायाचित्र ः निखिल माळकर)
मनभेदी कविता लिहिणे आवश्यक
अनंत वैद्य ः सावंतवाडीत तुतारी कवी संमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः प्रेक्षकांच्या मनाला शेवटपर्यंत भिडेल, अशी अभ्यासपूर्ण कविता लिहणे गरजेचे आहे. आपल्यात काय बुद्धिमत्ता आहे हे ओळखून साहित्य अथवा कविता लिहायला हवी, असे मत ज्येष्ठ कवी साहित्यिक जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलनाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी व्यक्त केले. येथील मोती तलावाच्या काठी केशवसुत कट्ट्याजवळ जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन व मराठी भाषा दिन कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे आयोजित केला होता. याचे उद्घाटन श्री. वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, स्वागताध्यक्ष कोमसापचे सुभाष गोवेकर, कोमसाप केंद्रीय कार्यकारणी सदस्या साहित्यिका उषा परब, कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा, जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, मराठी अध्यापक संघाचे भरत गावडे, मालवणी कवी रुजारियो पिंटो, कुडाळ तालुका अध्यक्षा वृंदा कांबळी आदी उपस्थित होते. श्री. वैद्य यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सावंतवाडी कोमसाप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्री. वैद्य पुढे म्हणाले, ‘‘कविता कशी लिहावी, कशी लिहू नये हे सर्वजण सांगत असतात. परंतु, कवितेत काय लिहू नये हे सांगायला हवे. यासाठी कविता लिहिण्यापूर्वी ती रसिकांना शेवटपर्यंत ऐकायला आवडायला हवी. मनाला भिडायला हवी. अशी अभ्यासपूर्ण आणि वाचनीय कविता लिहिणे गरजेचे आहे. आपल्यात बुद्धिमत्ता आहे, हे ओळखायला शिकायला हवे. बुद्धिमत्तेचे ५२ प्रकार आहेत आणि हे ५२ ही प्रकार आपण आत्मसात केले तर निश्चितच आपण यशाची किनार गाठू. कवितेत रिदम असायला हवा.’’
केशवसुतांच्या ‘तुतारी’ कवितेची आठवण म्हणून बसविलेल्या तुतारीच्या सानिध्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे कवी संमेलन कोमसाप सावंतवाडी शाखेने आयोजित केले होते. यात जिल्हाभरातील अनेक कवी कवयित्रीनी सहभाग घेतला होता. कवी रुजारियो पिंटो यांच्या ‘शालग्या’ या मालवणी कवितेने तुतारी कविसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित असलेल्या कवी-कवयित्रींनी कविता सादर करून काव्य संमेलनात रंगत आणली. कवी दीपक पटेकर, अॅड. नकुल पार्सेकर, प्रा. रुपेश पाटील यांच्यासह कुडाळच्या अदिती मसुरकर यांची बालकविता, विठ्ठल कदम, कल्पना बांदेकर, मंगल नाईक-जोशी, ऋतुजा सावंत-भोसले, प्रज्ञा मातोंडकर, उषा परब, रवींद्र ओगले, सोमा राऊळ आसोली, रा. भा. खानोलकर, वाय. पी. नाईक, मुकुंद पिळणकर, तसेच आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी जयराज मरकड, तारामती पद्मपल्ले, वैभव रांजवन यांनी सामाजिक विषयांवरच्या कविता सादर केल्या. डॉ. मेधा फणसळकर, स्नेहल फणसळकर, सुरेश पवार, वालावलकर, संदेश धुरी, सुधीर धुमे, प्रवीण ठाकूर, यशोधन चव्हाण, रामदास पारकर आदींनी काव्यरचना सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमसापच्या कार्यकारणी सदस्या मेघना राऊळ, तुतारी काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन कवी विठ्ठल कदम यांनी केले. प्रास्ताविक सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, स्वागत प्रा. सुभाष गोवेकर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, नंदकुमार गावडे, रक्तदाता संघटनेचे शुभम बिद्रे, श्री. बांदेकर, कोमसाप माजी जिल्हाध्यक्ष अॅड. अरुण पणदूरकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, सहसचिव राजू तावडे, विनायक गांवस, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, रामदास पारकर, धोंडी मसूरकर, अदिती सामंत, कल्पना बांदेकर, श्री. कासले, किशोर नांदिवडेकर, रत्नाकर कोळंबकर, किशोर वालावलकर, संजीव पालकर, शंकर प्रभू, कोमसाप सावंतवाडी, कुडाळ, मालवण, आदी शाखांचे सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. कोमसापने शिवजयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे वितरित करण्यात आली. ही निबंध स्पर्धा अमोल टेंबकर यांनी मातोश्रींच्या स्मरणार्थ प्रायोजित केली होती. त्या निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले.
---------
चौकट
हिंदी भाषाच मराठीला मारक
श्री. वैद्य म्हणाले, ‘‘आपण इंग्रजीमुळे मराठी भाषा संपेल की काय, अशी भीती व्यक्त करतो. परंतु, मराठी भाषेला इंग्रजीची भीती नसून खऱ्या अर्थाने हिंदी भाषाच मराठीला भीतीदायक आहे. आपण वाक्यप्रचारात किंवा कुठेही बाहेर जातो तेव्हा हिंदीचा सर्रास वापर करतो. त्यामुळे भविष्यात मराठीला हिंदी भाषाच मारक ठरू शकते. त्यामुळे मराठी भाषा टिकवायची असेल तर आपण आपल्या वाक्यप्रचारात आणि मराठी भाषा नेहमी आपण आत्मसात करायला हवी.’’