
रत्नागिरी ः कुवारबावमधील ते अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश
कुवारबावमधील ते बांधकाम हटवण्याचे आदेश
तहसीलदारांनी दिली अतिक्रमण हटवण्याची नोटीस ; कारवाईकडे सर्वांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीत रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गालगत ग्रामपंचायत कमानीशेजारी अनधिकृतरित्या चिऱ्याचे बांधकाम सुरू आहे. या प्रकरणी तहसीलदार शशिकांत जाधव यांनी संबंधितांना अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यानंतर ८ दिवसात अतिक्रमण हटवले नाही तर शासकीय खर्चाने अतिक्रमण काढले जाईल आणि त्याचा खर्च वसूल करण्यात येईल, असेही नोटिसीमध्ये म्हटले आहे. तहसीलदार जाधव यांनी याला दुजोरा दिला.
शासकीय जागेवरील अतिक्रमण आठ दिवसांच्या आत हटवून जागा पूर्ववत मोकळी करून द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. तसे न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५० नुसार कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुवारबाव परिसरात हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. कुवारबाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या अखत्यारितील महामार्गानजीक ग्रामपंचायत कमानीशेजारील मोठ्या शासकीय भूखंडाचा ताबा काहींनी जबरदस्तीने घेतला आहे. संबंधित संस्था शासनदरबारी नोंदणीकृत नाही, असेही माहितीच्या अधिकारातील माहितीवरून स्पष्ट झाले आहे; मात्र त्या ठिकाणी आता अजून व्यापक स्वरूपात चिरेबांधी बांधकाम चालू केले आहे. त्या जागेत नळपाणी आणि वीजजोडणीही देण्यात आली आहे.
या अतिक्रमणाबाबत सातत्याने तक्रारी येऊनही हा विषय ग्रामपंचायतीने गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. स्थानिक ग्रामस्थांनी याचा विरोध करत वेगवेगळ्या शासकीय स्तरावर तक्रारी अर्ज दाखल केले आहेत. तहसीलदार जाधव यांनी अतिक्रमण हटवण्याची नोटीस ७ फेब्रुवारीला जारी केली आहे. नोटिसीला २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. या नोटीसची प्रत तलाठ्यांना पाठवण्यात आली असून त्यांनी ही नोटीस संबंधितांना समक्ष बजावून त्याचा बजावणी अहवाल तहसीलदारांना द्यायचा आहे.
चौकट
उपोषणाचा इशारा
कुवारबावमधील या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही तर या विरोधात उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला असून या बांधकामावर तातडीने कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.