संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat28p14..jpg ः KOP23L85788 साखरपा ः लोकनृत्य सादर करताना विद्यार्थी.

प्रत्येक घरात मराठी
ज्ञानकोश हवा ः चरापले
साखरपा ः मराठी भाषा टिकवायची असेल तर पुस्तकांप्रमाणेच प्रत्येक घरात ज्ञानकोश आवश्यक आहे, असे मत निवृत्त शिक्षक चरापले यांनी व्यक्त केले. कोंडगाव येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर स्कूलमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केले. मराठी भाषा दिन पारंपरिक पद्धतीने कबनूरकर स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रमुख पाहुणे चरापले, मुख्याध्यापिका लिना कबनूरकर आणि संस्था चेअरमन श्रीधर कबनूरकर यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर शिक्षिका मनीषा जंगम यांनी कुसुमाग्रज यांचा जीवनपट कथन केला. शिक्षिका शिल्पा होनाळे यांनी गीतगायन केले. शिक्षिका स्वरूपा बंडबे यांनी स्वरचित कविता सादर केली. सातवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्व सांगणारी नाटिका सादर केली. चरापले यांनी मराठी भाषेचा उमग आणि तिची स्थित्यंतरे त्यांनी सांगितली. ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास अशा थोर व्यक्तींनी मराठी भाषा समृद्ध केल्याचे ते म्हणाले. सध्या मराठी बोलीभाषा ही भ्रष्ट होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. जी भाषा आपण बोलतो ती शुद्ध असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी प्रत्येक मराठी घरात मराठी ज्ञानकोश असावा, अशी अपेक्षा चरापले यांनी व्यक्त केली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी संस्कृती जोपासली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
--------------

रत्नागिरी ग्राहकपेठेतर्फे
उद्योगिनी, बचतगटांचे प्रदर्शन
रत्नागिरी ः जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून महिला बचतगट व उद्योगिनींना प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे यांनी रत्नागिरी ग्राहकपेठेतर्फे 21 मार्चपासून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शांतीनगर, नाचणे येथील बालाजी मंगल कार्यालयात हे प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. प्रदर्शनात महिला बचतगट, उद्योगिनी विविध गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहेत. या प्रदर्शनात महिलांसाठी नृत्य, वेशभूषा स्पर्धा, सांस्कृतिक, कायदेविषयक, आरोग्यविषयक मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच फनिगेम्सचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी प्राची शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

rat28p15.jpg ःKOP23L85789 राजापूर ः संत निरंकारी मंडळ कोदवली राजापूर युनिटच्यावतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

संत निरंकारी मंडळातर्फे स्वच्छता अभियान
राजापूर ः विविध सामाजिक उपक्रम राबवणार्‍या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने संत निरंकारी मंडळ कोदवली राजापूर युनिटच्यावतीने शहरामध्ये नुकतेच स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यामध्ये शहरातील गणेश विसर्जन घाट ते कोंढेतड पूल या परिसरातील स्वच्छता करताना सुमारे 5 ट्रॅक्टर एवढ्या विविध स्वरूपाच्या कचर्‍याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून गणेश विसर्जन घाट ते कोंढेतड पूल हा परिसर स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून स्वच्छ आणि सुंदर करत या युनिटने सार्‍यांसमोर सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श ठेवला आहे. स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड अन् संवर्धनसारखे विविध सामजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवणार्‍या संत निरंकारी मंडळ कोदवली राजापूर युनिटने ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ हे ब्रीदवाक्य घेऊन शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवले. सकाळी सुरू झालेले हे अभियान दुपारपर्यंत सुरू होते. कोदवली युनिटचे मुखी महात्मा सिद्धेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या अभियानामध्ये सेवादल संचालक दत्तराज सुवार, चारूलता चाळके, सारीका कोतरे, प्रेस व पब्लिसिटी विभागाचे सुभाष नवाळे, गजानन भोगले, शिक्षक मनिष वाघाटे यांच्यासह 125 हून अधिक भक्तगण सहभागी झाले होते.
-------------

rat28p19.jpg-KOP23L85793
रत्नागिरी ः सौ. सविता कामत विद्यामंदिरमध्ये वार्षिक क्रीडास्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बक्षीस देताना बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक संतोष सावंतदेसाई. सोबत मान्यवर.

कामत विद्यामंदिरमध्ये
वार्षिक क्रीडा स्पर्धा
रत्नागिरी ः आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिरमध्ये शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा झाल्या. मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या 25 मीटर व 50 मीटर चालणे, 50 मीटर व 100 मीटर धावणे, सॉफ्ट बॉल थ्रो, गोळाफेक इत्यादी व (कै.) प्रताप मंगेश कानविंदे शीघ्र उपचार केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी एक मिनिटात तांदळामधून जास्तीत जास्त चॉकलेट शोधून काढणे या स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील सर्व विद्यार्थी यामध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. स्पर्धांचे बक्षीस वितरण बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक संतोष सावंतदेसाई, अधिकारी भुवनेश्वर मिश्रा, देणगीदार पांडुरंग भोळे, किरण डान्स अॅकॅडमीचे किरण बोरसुतकर, आविष्कार संस्थेचे अध्यक्ष सीए बिपिन शहा व उपाध्यक्षा दीप्ती भाटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे बालेवाडी येथील राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 6 विद्यार्थ्यांचाही बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. कलाशिक्षक बाबासाहेब कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
------------

rat28p24.jpg ःKOP23L85781 कुडुक खुर्द ः दत्तरामवाडी येथील श्रीरामप्रभू मंदिराचे जीर्णोद्धार उद्घाटन करताना माजी आमदार संजय कदम व अन्य.

श्रीरामप्रभू मंदिर जीर्णोद्धाराचे उद्घाटन
मंडणगड ः तालुक्यातील कुडुक खुर्द दत्तरामवाडी येथे श्रीरामप्रभू मंदिर जीर्णोद्धार उद्घाटन सोहळा 25 फेब्रुवारीला मंडणगड-दापोली-खेडचे माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी महाड-पोलादपूर-माणगावचे आमदार भरत गोगावले उपस्थित होते. या कार्यक्रमास रमेश दळवी, प्रकाश शिगवण, भाई पोस्टुरे, मुझ्झफर मुकादम, नितीन म्हामुणकर, सुभाष सापटे, श्रुती साळवी, डॉ. रमेश चव्हाण, एकनाथ सुकूम, नितीन घाणेकर, संतोष जऊळ, सचिन घाणेकर, रघुनाथ गजमल, संदेश खैरे, श्रीराम सेवक ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोहर कदम, सचिव रवींद्र कदम, खजिनदार विजय कदम, श्रीराम मंदिर जीर्णोद्धार समिती अध्यक्ष देवचंद कदम, उपाध्यक्ष अंकुश कदम, उपस्थित होते.