
रत्नागिरी- उत्तरपत्रिकांवर बहिष्कार
rat२८p१८.jpg-KOP२३L८५७९२ रत्नागिरी ः दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्काराचे निवेदन शिक्षणाधिकारी कार्यालयात देताना तुफील पटेल, संदेश रहाटे, रामचंद्र केळकर आदी.
दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार
शिक्षण संघर्ष संघटना; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी
रत्नागिरी, ता. २८ ः जुनी पेन्शन योजना लागू करा अन्यथा दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यमापन कार्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षण संघर्ष संघटनेच्या जुनी पेन्शन कोअर कमिटीने दिला. या संदर्भातील निवेदन संघटनेच्यावतीने शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आले.
बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. २ तारखेपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. या दोन्ही इयत्तांच्या उत्तरपत्रिका मूल्यमापन कार्यावर बहिष्काराबाबतचे निवेदन कोकण विभागीय मंडळात विभागीय सचिवांना, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, मुख्यमंत्री, सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा जुनी पेन्शन योजना कृती समितीचे अध्यक्ष तुफील पटेल, जिल्हा सचिव संदेश रहाटे, राज्य प्रतिनिधी रामचंद्र केळकर, सल्लागार प्रकाश मांडवकर, जिल्हा सहसचिव महेंद्र पवार, रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रदीप पवार, निशिकांत देसाई, सुनील कांबळे, सुहास दाभोळकर, स्मिता जोशी उपस्थित होते. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या संघटनेने निवेदनात म्हटले आहे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांवरील व नंतर १०० टक्के अनुदानावर आलेले कर्मचारी आहेत. २००५ पूर्वी अनुदानित नसल्यामुळे १९८२ च्या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यापासून नियुक्त दिनांक लक्षात न घेता वंचित ठेवले आहे. या मागणीसाठी २०१० पासून निवेदन, मोर्चा, धरणे आंदोलन, आमरण उपोषण करूनही शासनाने सकारात्मक विचार केला नाही. त्यामुळे आता परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.