सावंतवाडीतील करवाढ अन्यायकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील करवाढ अन्यायकारक
सावंतवाडीतील करवाढ अन्यायकारक

सावंतवाडीतील करवाढ अन्यायकारक

sakal_logo
By

swt२८८.jpg
८५८०३
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना राजन तेली. बाजुला मनोज नाईक, अजय गोंदावळे, मोहिनी मडगावकर, सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, विनोद सावंत आदी.

सावंतवाडीतील करवाढ अन्यायकारक
राजन तेलीः जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ः शहरातील घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांमध्ये प्रशासनाकडून करण्यात आलेली बेसुमार वाढ अन्यायकारक आहे. खरे तर पालिकेवर प्रशासकीय कारभार सुरू असताना आजी-माजी लोकप्रतिनिधी व नागरिकांशी चर्चा करूनच निर्णय घेणे गरजेचे होते; मात्र मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय म्हणजे एकाधिकारशाही असून त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरही सकारात्मक निर्णय न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या निर्णयाला स्थगिती घेण्यात येईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
येथील भारतीय जनता पार्टीच्या येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तेली यांनी करवाढीच्या निर्णयाविरोधात भाजपाची भूमिका मांडली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते संजू परब, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते.
श्री. तेली म्हणाले, ‘‘सावंतवाडी शहर वगळता जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले व पालिकामध्ये कर प्रणालीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही; मात्र सावंतवाडी शहरातच प्रशासनाकडून असा निर्णय का घेण्यात आला, याची माहिती मुख्याधिकाऱ्यांकडून जाणून घेण्यात येणार आहे. याबाबत सकारात्मक चर्चा करून हा निर्णय स्थगित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. खरे तर सर्वपक्षीय नेत्यांशी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींशी निर्णय घेऊन कर प्रणाली संदर्भात निर्णय घेणे अपेक्षित होते; मात्र मुख्याधिकाऱ्यांनी परस्पर घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे याबाबत त्यांच्याशी चर्चेतून निर्णय निघाल्यास ठीक, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या निर्णयावर स्थगिती घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून गेल्यामुळे येथील व्यापार उद्योगाला काही प्रमाणात फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या माध्यमातून सावंतवाडी शहराचा विकास करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून आमचे प्रयत्न आहेत. शहराच्या विकासासाठी नुकताच ७ कोटी ३४ लाखांचा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पालिकेला देण्यात आला आहे. ऐतिहासिक मोती तलावात तसेच परिसराचे शुशोभीकरण करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. येथील लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे. नरेंद्र डोंगरावरून दोन रोप वे शहरात आणण्यासाठीही प्रयत्न आहेत. पालकमंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून आवश्यक निधीचा पुरवठा करीत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी अधिकचा निधी आणण्याचा प्रयत्न आहे.’’

चौकट
मल्टिस्पेशालिटी जागेचा प्रश्‍न सुटावा
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेसंदर्भात अनेक मतमतांतरे असून याबाबतचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांशी चर्चा करून घेणे आवश्यक आहे. सावंतवाडी शहर तसेच शहरालगतच्या ग्रामीण भागात जागा उपलब्ध असल्यास त्यासंदर्भात पाठपुरावा करून गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मल्टिस्पेशालिटीच्या प्रश्नाला पूर्णविराम देणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजपच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य राहील, असे यावेळी तेली म्हणाले.
..................

swt२८१०.jpg
८५८३५
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना बबन साळगावकर. सोबत अन्नपूर्णा कोरगावकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, रवी जाधव आदी (छायाचित्र ः रुपेश हिराप)

वाढीव कराविरुध्द जनआंदोलन उभारू
बबन साळगावकर ः सावंतवाडीतील निर्णयावर टिका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः येथील पालिकेने अचानक वाढवलेली घरपट्टी व पाणीपट्टी अन्यायकारक आणि गरिबांचे कंबरडे मोडणारी आहे. प्रशासनाने घेतलेला निर्णय निषेधार्ह असून ही दरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी; अन्यथा या प्रश्नी नागरिकांना घेऊन जनआंदोलन उभारू, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. गरिबांच्या मातीच्या घरांना २५ रुपयांवरून थेट ४०० रुपये दरवाढ करून प्रशासनाने आपले दात दाखविले आहेत. याबाबत लवकरच प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. साळगावकर यांनी आज आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढीबाबत भूमिका मांडली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, रवी जाधव आदी उपस्थित होते.
श्री. साळगावकर पुढे म्हणाले, "पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या बजेटमध्ये पाणीपट्टी आणि घरपट्टीमध्ये भरमसाट वाढ केली आहे. ही वाढ गरिबांचे कंबरडे मोडणारी आहे. यापूर्वी गरिबांच्या मातीच्या घरांना २५-५० रुपये असलेली घरपट्टी आता थेट ४०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. मुळात २६ टक्केपेक्षा जास्त दरवाढ करता येत नसल्याने त्याला पर्याय शोधून त्यांनी गरिबांच्या घरांवर करवाढ केली आहे. या करवाढीला कुठलाही आधार नसून ती नागरिकांना अन्यायकारक अशीच आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावीच लागणार. पाणीपट्टी प्रति युनिट तीन रुपये दर वाढविण्यात आला आहे. हे वाढीव दर पालिकेने कमी करावेत. प्रशासनाकडून वाढविण्यात आलेली करपट्टी आणि पाणीपट्टी अन्यायकारक आहे. प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा लोकांना घेऊन हे दोन्ही विषय पेटवणार आहोत." माजी उपनगराध्यक्ष कोरगावकर म्हणाल्या, "२५ रुपयांवरून थेट ४०० रुपये करवाढ करणे योग्य नाही. सर्वसामान्य नागरिक यामुळे होरपळून निघणार आहे. दुसरीकडे पाण्याचा प्रश्न गंभीर असून काही भागांत पाणीच येत नसताना पाणीपट्टीत केलेली वाढही चुकीची आहे. आधी नागरिकांना मुबलक पाणी देणे गरजेचे आहे. ज्या भागात पाणी येत नाही, त्या भागात पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. त्यानंतरच करवाढ करणे योग्य ठरते."
................