
विर्डीत जीर्णोद्धार सोहळा
विर्डीत जीर्णोद्धार सोहळा
दोडामार्ग ः विर्डी गावात महादेव मंदिर जीर्णोद्धार व सातेरी देवीचा सातवा वर्धापन दिन उत्साहात झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, प्रकाश कोरगावकर, साहित्यिक आनंद मयेकर, सरपंच सुशांत गावस, कादंबरीकार चंद्रकांत गावस, भगवान घाडी, प्रभाकर गवस, श्रीपाद गावस, अंकुश गावस उपस्थित होते. वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विर्डीतील तरुणाईचा सहभाग वाखाणण्यासारखा असतो, असे म्हापसेकर यावेळी म्हणाले. मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिनासाठी भरीव देणगी दिलेल्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कलात्मक योग प्रकारात राष्ट्रीय पदक विजेत्या लक्ष्मी इलकल, नंदिनी धिमान व दीपाली ननावरे यांनी तांडवनृत्य सादर केले. सूत्रसंचालन दीपक गावस यांनी केले.
--
‘तक्रार निवारण’मध्ये रिक्त पदांनी गैरसोय
कणकवली ः जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये गेली सुमारे ५ वर्षे अध्यक्षांसह २ सदस्य आणि ८ कार्यालयीन कर्मचारी मिळून ११ पदे मंजूर आहेत; मात्र २०१७ पासून या आयोगामध्ये केवळ सहाय्यक अधीक्षक वगळता उर्वरित १० पदे रिक्त आहेत. रत्नागिरी आयोग कार्यालयातील केवळ १ अधिकारी प्रभारी म्हणून कामकाज पाहत आहेत. रत्नागिरी आयोगात नियुक्त असलेल्या त्रिसदस्यांपैकी केवळ अध्यक्ष आणि १ सदस्य हेच सिंधुदुर्गात दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोगाचे कामकाज पाहतात. त्यामुळे तक्रारदार ग्राहकांच्या शेकडो तक्रारींचे निकाल रखडत आहेत. तरी शासनाने ही रिक्त १० पदे तातडीने नियुक्त करावीत, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र - कोकण विभाग, जिल्हा शाखेतर्फे अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
---
सुमित दाभोलकरांना ‘महाराष्ट्र कला गौरव’
ओरोस ः कला क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्या कलाकारांच्या सन्मानार्थ पुणे येथील आर्ट बीटस् या संस्थेमार्फत दिल्या जाणार्या महाराष्ट्र युवा कला गौरव २०२२ पुरस्काराने कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे येथील सुमित दाभोलकर यांना सन्मानित केले. त्यांच्या कॅलिग्राफी (सुलेखनकला) या क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांना नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दाभोलकर हे सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांनी सुलेखनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कलाकृती साकारल्या आहेत. यातील मोजक्याच कलाकृती यांनी २०२२ अंतर्गतच्या पुरस्कार निवडीसाठी पाठविल्या होत्या.
---
ओरोसला रविवारी गुणवंतांचा गौरव
ओरोस ः जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीतर्फे गुणवंत विद्यार्थी, संचालक यांचा सत्कार व सभासद प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयाच्या सभागृहात ५ मार्चला आयोजित केला आहे. संस्थेच्या २०२१-२२ या सालातील सभासद पाल्यांमधून दहावी परीक्षेत प्रथम १ ते १० क्रमांक प्राप्त, बारावी कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी.व्ही.सी. शाखेतील प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक, पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारकांतून प्रथम तीन क्रमांक प्राप्त पाल्यांसह संचालकांचाही सत्कार होणार आहे. गुणगौरव कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता, तर दुपारी ३ वाजता सभासदांसाठी ''सहकार भारती'' प्रशिक्षण संस्था कराडमार्फत सहकार प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. सभासदांनी गुणगौरव, सत्कार सोहळा व सभासद प्रशिक्षणास उपस्थित राहवे, असे आवाहन अध्यक्ष नामदेव जांभवडेकर, उपाध्यक्ष नीलम बांदेकर यांनी केले आहे.