‘मराठी’ संवर्धन जबाबदारी प्रत्येकाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मराठी’ संवर्धन जबाबदारी प्रत्येकाची
‘मराठी’ संवर्धन जबाबदारी प्रत्येकाची

‘मराठी’ संवर्धन जबाबदारी प्रत्येकाची

sakal_logo
By

85946
मालवण ः येथील भंडारी हायस्कूलमध्ये साहित्यिका स्नेहल फणसळकर यांचा सत्कार करताना विजय पाटकर. सोबत इतर.

‘मराठी’ संवर्धन जबाबदारी प्रत्येकाची

स्नेहल फणसळकर ः भंडारी हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन

मालवण, ता. २८ : मातृभाषा ही आपल्या हृदयाजवळ असते. म्हणूनच मराठी ही आपली मातृभाषा आहे. प्रत्येकाने आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून आणि वाचनातून मराठी भाषा वाढवून तिचे जतन केले, तरच मराठीला अभिजात भाषा करण्याचा मार्ग सुकर बनेल, असे प्रतिपादन कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील साहित्यिका स्नेहल फणसळकर यांनी येथे केले.
येथील भंडारी ए. सो. हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन साहित्यिका फणसळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. व्यासपीठावर संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्याध्यापक वामन खोत, सहाय्यक शिक्षिका संजना सारंग, अस्मिता वाईरकर, सुनंदा वराडकर, कला शिक्षक अरविंद जाधव, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई उपस्थित होते. प्रारंभी सौ. सारंग यांनी प्रास्ताविक केले. तर वराडकर यांनी परिचय केला.
सौ. फणसळकर म्हणाल्या, ‘‘शाळांमध्ये मराठी भाषाविषयक जास्तीत जास्त कार्यक्रम व्हायला हवेत. कुसुमाग्रजांनी आपल्या काळाच्या पुढे जाऊन लिखाण केले. अनेक साहित्यिकांनी लेखणीतून मराठी भाषा पुढे नेली; मात्र इतक्या साहित्यिकांमधून कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होतो, यातच त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य दिसून येते. मराठीतील जुन्या ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. त्यातून आपली संस्कृती आणि मराठीची गोडी कळते.’’
यावेळी पाटकर यांनी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. वा. शिरवाडकर यांनी मराठी भाषेत विविधांगी साहित्य निर्मिती करून मराठी भाषा समृद्ध केली. शिरवाडकर आणि मराठी साहित्यिकांचे साहित्य विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे. आजचे युग स्पर्धेचे असल्याने या युगात वाचन केले तरच विद्यार्थी टिकू शकतो, असे सांगितले. मुख्याध्यापक वामन खोत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रंथालय विभागातर्फे ‘मोगरा’ या हस्तलिखिताचे प्रकाशन सौ. फणसळकर यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते फणसळकर यांचा सत्कार झाला. यावेळी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात आलेल्या हस्ताक्षर, निबंध आणि वाचिका अभिनय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. सौ. वाईरकर यांनी आभार मानले.
--
प्राथमिक शिक्षण मराठीतूनच हवे
सौ फणसळकर म्हणाल्या, ‘‘काळानुरूप मराठी बोलताना तिचा गाभा कायम राहील, याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या भाषेवर प्रेम केले पाहिजे. आज इंग्रजी भाषेकडे कल वाढत असतानाच मुलांचे प्राथमिक शिक्षण तरी मराठीमधून झाले पाहिजे. मराठीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपणच ही भाषा जपली पाहिजे.’’