
विद्यार्थ्यांनी जाणले ग्रामपंचायतीचे कामकाज
85979
कलमठ : येथील ग्रामसभेत गावातील जिल्हा परिषद शाळांतील मुलांनी सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांनी जाणले ग्रामपंचायतीचे कामकाज
कलमठमधील उपक्रम; ‘बालस्नेही व महिलास्नेही’चे कौतुक
कणकवली, ता.२८ : ग्रामपंचायतच्या मासिक सभेत कामकाज कसे चालते याची माहिती देण्यासाठी कलमठ गावातील विद्यार्थ्यांनाच सहभागी करून घेण्यात आले. कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवला. यात आयत्या वेळच्या विषयावेळी विद्यार्थ्यांनीही अनेक शंका विचारून ग्रामपंचायत कामकाजाची माहिती करून घेतली.
कलमठ ग्रामपंचायतीने ‘बालस्नेही व महिलास्नेही’ उपक्रम सुरू केला आहे. यात प्राथमिक शाळेतील मुलांना गावाच्या विकासाचा गाडा ग्रामपंचायतीमधून कसा हाकला जातो. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची ग्रामपंचायतीमध्ये काय भूमिका असते. तसेच ग्रामपंचायतीचे प्रशासन कसे चालते? याची माहिती देण्यासाठी आज कलमठच्या ग्रामसभेत मुलांना देण्यात आली.
कलमठ ग्रामपंचायतीची मासिक सभा सलग तीन तास चालली. यानंतर आयत्या वेळेच्या विषयावेळी विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मासिक बैठक कशासाठी असते?, अजेंडा, ठराव म्हणजे काय? इतिवृत्त म्हणजे काय? विकासकामांसाठी निधी कुठून येतो आदी प्रश्न उपस्थित केले. त्यांना सरपंच संदीप मेस्त्री आणि ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी दिली. या बैठकीला उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सदस्य रवींद्र यादव, प्रीती मेस्त्री, दिनेश गोठणकर, अनुप वारंग, नितीन पवार, स्वाती नारकर, सुप्रिया मेस्त्री, हेलन कांबळे, श्री.शेख, श्रेयश चिंदरकर, तनिष्का लोकरे, सचिन खोचरे, प्रियाली आचरेकर, नजराना शेख उपस्थित होते. पुढच्या बैठकांमध्ये ‘महिला स्नेही’ संकल्प मधून महिला ग्रामसंघ व बचतगट प्रतिनिधींना मासिक बैठकीमध्ये सहभागी करून घेणार असल्याची माहिती सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली.