सदर ः रवळनाथ आपली रक्षा करतो ही श्रद्धा

सदर ः रवळनाथ आपली रक्षा करतो ही श्रद्धा

rat०११५.txt

बातमी क्र..१५
(२३ फेब्रुवारी टुडे चार)
जनरिती- भाती ............. लोगो

rat१p५.jpg ः
८६०६१
डॉ. विकास शंकर पाटील

कोकणात अधिकतम मंदिरे रवळनाथाची आढळतात. दक्षिण कोकणात २११ मंदिरे रवळनाथाची आहेत. उत्तरेकडील पट्ट्यात मात्र या देवाची मंदिरे फारशी दिसत नाहीत. कणकवली तालुक्यात १६, देवगड तालुक्यात ११, वेंगुर्ला तालुक्यात २६, कुडाळ परिसरात ३१, मालवण तालुक्यात ३७ तर सावंतवाडी तालुक्यात सर्वात जास्त ५३ रवळनाथाची मंदिरे आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र ही संख्या कमी होत जाते. राजापूर तालुक्यात सहा, चिपळूण तालुक्यात सात, दापोलीत चार, खेडमध्ये दोन, गुहागरमध्ये चार, रत्नागिरीत दोन, संगमेश्वरमध्ये दोन, लांजात दोन अशी मंदिरे आढळतात. ओटवणे, आजगाव, असोली, आरवली, तेंडोली, खानोली, केरवडे, आंबडोस, बसनी, आडिवरे इत्यादी गावातील रवळनाथ मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. श्री देव रवळनाथाची मूर्ती उभी चतुर्भुज असते. त्रिशूल, डमरू, खडग् आणि अमृतपात्र या चार वस्तू चार हातात असतात. माथ्यावर मुकुट, गळ्यात चार मुंडमाला असे त्याचे सामान्य स्वरूप दिसते. आयुधावरून तो शिवावतार आहे असे वाटते.

- डॉ. विकास शंकर पाटील
--

रवळनाथ आपली रक्षा करतो ही श्रद्धा

दक्षिण कोकण व गोवा या भागात ग्रामरक्षक किंवा क्षेत्रपाल देवता म्हणून रवळनाथाची पूजा केली जाते. रवळनाथ हा देव अष्टभैरवांपैकी एक. रूद्र याचा अवतार मानला जातो तर काहीजण त्याला शंकराचा अवतार मानतात. पु. रा. बेहरे यांनी केदार रवळेश हाच रवळनाथ असल्याचे मानले आहे. रवळनाथास ज्या वसाहतकाराने कोकणात आणले तो वसाहतकार पराक्रमी व गुणाने सर्वात अग्रभागी असावा. त्यामुळेच ही देवता लोकप्रिय ठरून तिला देवस्कीत प्रधानस्थान मिळाले, असे बेहरे म्हणतात. रवळनाथाचे तरंग सार्वत्रिक आहेत आणि तेच मुख्य तरंग आहेत. आजरा, चंदगड या भागातही रवळनाथाची मंदिरे आणि भक्त अधिक दिसतात. यावरून रवळनाथाचे भक्त आजरा चंदगड मार्गाने आले असावेत, असा कयासही बांधला जातो. रवळनाथाला नाथ संप्रदायी म्हणणारेही आहेत. काहीही असो, रवळनाथ दक्षिण कोकण व गोवा इथल्या गावांची क्षेत्रपाल देवता आहे हे निश्चित. पेडणे (गोवा), चंदगड (बेळगाव) व ओटवणे( सावंतवाडी) येथील तीन रवळनाथ हे प्रमुख मानले जातात. या तीन मूर्तीतही साम्य आहे.
या संदर्भात एक दंतकथा ऐकायला मिळते. गुजरातवर मुस्लिमांचे आक्रमण झाले तेव्हा पळापळ सुरू झाली. आपल्या देवांची तोडफोड होईल या भीतीपोटी हिंदू लोकांनी आपले देव व महत्वाच्या वस्तू एका जहाजात भरल्या व त्या सुरक्षिततेसाठी कोकणाच्या दिशेने पाठवून दिल्या. या मूर्ती आणि वस्तूने भरलेले जहाज समुद्रकिनाऱ्याला आल्यावर जड होऊ लागले. जहाज जागचे हालेना. तेव्हा जहाजमालकास त्यावरील एका मूर्तीने दृष्टांत दिला की, आपली स्थापना ओटवणे येथे व्हावी. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या मूर्तीनेही पेडणे व चंदगड येथे आपली स्थापना करावी असे बजावले. झालेल्या दृष्टांताप्रमाणे त्यांची स्थापना त्या त्या ठिकाणी करण्यात आली. या कालखंडात गुजरातमध्ये जैन धर्माचे प्राबल्य होते. त्यामुळे या मूर्ती जैन तीर्थकारांच्या असाव्यात, अशीही शक्यता वर्तवली जाते. ओटवणे येथील रवळनाथ हे या गावचे प्रमुख दैवत असून, यास सावंतवाडीच्या राजघराण्याचा कुलदेव मानतात. रवळनाथाशिवाय या गावचे पानही हलत नाही, असे म्हटले जाते. कोणतेही चांगले काम करताना, बाहेर कुठेही जाताना व शुभकार्य करताना रवळनाथाला कौल लावला जातो. या मूर्तीच्या गळ्यात रूद्राक्ष माळा असून, उजव्या हाताखाली सेविकाचौऱ्या ढाळत आहेत. हा रवळनाथ सर्प व कासवावर आरूढ झाल्याचे दिसते. चंदगड, पेडणे, ओटवणे या तिन्ही गावच्या रवळनाथांनी तीन प्रदेशाचा मिळून त्रिकोण तयार केला आहे. रवळनाथाच्या मूर्तीतही काही प्रमुख भेद असल्याचे दिसते. आजगावच्या रवळनाथाची मूर्ती द्विभुज आहे.
तेंडोली व खानोली या रवळनाथांविषयी एक गमतीशीर कथा ऐकायला मिळते. तेंडोली गावात आंधळी देवी नावाची एक देवी आहे. या आंधळी देवीवरून तेंडोलीचा रवळनाथ व खानोली (वेंगुर्ले) येथील रवळनाथ यांचे वाकडे झाले. त्यांनी मारामारी केली. खानोलीच्या रवळनाथाने लाथ मारून तेंडोलीच्या रवळनाथ मंदिराची तटबंदी मोडली. तेव्हापासूनही तटबंदी दुरुस्त होत नाही, असेही सांगितले जाते. वेंगुर्ल्याच्या प्राचीन रवळनाथाला बंदरी रवळनाथ असेही म्हणतात. या रवळनाथाची सागरावर सत्ता चालते, असे मानले जाते. डॉ. भालचंद्र अकलेकर यांनी विठ्ठल व रवळनाथ यांच्यात समानता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण कोकणात विठ्ठलादेवी, विठ्ठलाई, विठू महाकाली अशा विठ्ठलाशी नाम साधर्म्य प्रकट करणाऱ्या देवता दिसतात. अनेक रवळनाथांचे ध्यान विठ्ठलासारखे असून तेथे एकादशीला उत्सव साजरा होतो. यावरूनही विठ्ठल व रवळनाथ यांच्यात साधर्म्य आहे, असे अभ्यासक मानतात. रवळनाथांच्या मूर्तीत असणारे वेगळेपण, रवळनाथ हा शिव की वैष्णव? रवळनाथाच्या उत्सवातील वेगळेपण या साऱ्याकडे मात्र रवळनाथाचा भक्त पाहत नाहीत. येथील भक्तगण रवळनाथाची भक्तीभावे पूजा करतात. त्याला श्रद्धेने शरण जातात. हा रवळनाथ आपली रक्षा करतो, ही येथील लोकांची श्रद्धा आहे.

(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com