
प्रांताधिकारी सुट्टीवर
प्रांतधिकारी पदाचा
फडांकडे कार्यभार
सावंतवाडीः प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर २१ मार्चपर्यंत रजेवर आहेत. या कालावधीत प्रभारी प्रांताधिकारी म्हणून उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे प्रशासक म्हणून हे कारभार पाहणार आहेत. प्रांताधिकारी पानवेकर हे गेल्या दोन दिवसांपूर्वी रजेवर गेले आहेत, ते महिनाभर रजेवर आहेत.
-----------------------
जिल्हानिहाय वसतीगृहे
सुरु होणार
कणकवलीः प्रत्येक जिल्हयात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतीगृहे सुरू करण्यात येणार आहेत. संबंधित प्रवर्गातील १०० मुले व १०० मुली या मर्यादेत प्रतिजिल्हा २०० याप्रमाणे ३६ जिल्ह्यांसाठी ७२ वसतीगृहे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
----------------------
राजेश गुरव
संगीत विशारद
कुडाळः तालुक्यातील हिर्लोक येथील प्राथमिक शिक्षक सखाराम उर्फ राजेश राघो गुरव यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालया (मुंबई) तर्फे घेण्यात येणार्या व संगीत क्षेत्रात मानल्या जाणार्या सर्वोच्च परीक्षेत संगीत विशारद होण्याचा मान मिळविला. या यशामुळे जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गुरव यांनी हिर्लोकसारख्या ग्रामीण भागातून संगीत क्षेत्रात गायक कलाकार म्हणून सफर केली. त्यांना भजनसम्राट गुरुवर्य कै. चिंतामणी बुवा पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले. संगीत विशारद अभ्यासक्रमासाठी अजित गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच आपण संगीत क्षेत्रातील या सर्वोच्च परीक्षांमध्ये यश प्राप्त केले.
---------------------
मालवण व्यापारी संघाचा
रविवारी स्नेहमेळावा
मालवणः तालुका व्यापारी संघाच्या सर्व सभासदांची सर्वसाधारण सभा व वार्षिक स्नेहमेळावा ५ मार्चला सकाळी ११ वाजता एक्झॉटिका-(चिवला कुरण) धुरीवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मालवण व्यापारी संघाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम निश्चित करून जाहीर करणे, महासंघाच्या २०२४ च्या निर्याजित ३६ व्या व्यापारी एकता मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा केली जाणार आहे. महासंघाच्या निर्देशास अनुसरून मालवण व्यापारी संघाच्या पर्यटन, वीज ग्राहक, युवा, महिला आदी सहयोगी समित्या नियुक्त करणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
--------------
वेंगुर्ले दहावी
बैठक व्यवस्था
वेंगुर्लेः श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे (वेंगुर्ले), कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली (वेंगुर्ले), रा. धो. खानोलकर हायस्कूल मठ (वेंगुर्लेव प. ना. मा. हायस्कूल तेंडोली (कुडाळ) या शाळांमधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ साठी परीक्षेस बसणार्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे केंद्र क्र. ८३०३ या केंद्रावर क्र. ८०२१८१७ ते ८०२१९५९ पर्यंत करण्यात आली आहे. याची संबधित विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे वेतोरे केंद्रसंचालक यांनी कळविले आहे.
----------