
सिंधुदुर्गात विक्रमी भातखरेदी
सिंधुदुर्गात विक्रमी भातखरेदी
कुडाळात सर्वाधीक ः गेल्या वर्षीपेक्षा १० हजार क्विंटलने वाढ
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १ ः जिल्ह्यात विक्रमी ९९ हजार ८३४ क्विंटल भातखरेदी झाली असून आतापर्यंतची ही सर्वाधिक खरेदी आहे. गतवर्षीच्या तुलनेत १० हजार क्विंटलने वाढ झाली आहे. कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ३९ हजार २९७.३३ क्विंटलभातखरेदी झाली. जिल्ह्यातील ५ हजार ५१६ शेतकऱ्यांनी भातविक्री केली असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १४ कोटीहुन अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात ६० हजार हेक्टरवर भातपीक लागवड केली जाते. ''श्री'' पध्दत आणि यांत्रिकीरणामुळे भात उत्पादनात देखील सरासरी वाढ झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत भातकापणी पूर्ण झाली. त्यानंतर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपासून भातखरेदीस प्रारंभ झाला. ऑनलाईन नोंदणी असल्यामुळे जिल्ह्यातील सहा ते सात केंद्रांवरच धीम्या गतीने भात खरेदी सुरू होती; परंतु त्यानंतर तालुका खरेदी-विक्री संघांनी कार्यालयामधून नोंदणी सुरू केली. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील ३७ भातखरेदी केंद्रांवर गतीने भातखरेदी सुरू झाली. यावर्षी शासनाने भाताला प्रतिक्विंटल २ हजार ४० रुपये दर जाहीर केला आहे.
यावर्षी जिल्ह्यातील ३७ भात खरेदी केंद्रांवर सुरू असलेली प्रक्रिया काल (ता. २८) थांबविण्यात आली. काल सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ५१६ शेतकऱ्यांनी ९९ हजार ८३४ क्विंटल भात विक्री केली. जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ३९ हजार २९७.३३ क्विंटल भात खरेदी झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात विक्री केलेल्या भातांची २० कोटी ३६ लाख ६२ हजार ५२२ रुपये इतकी रक्कम होत असून त्यापैकी सुमारे १४ कोटीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. उर्वरित रक्कम देखील येत्या काही दिवसांत जमा होणार आहे.
चौकट
गतवर्षीच्या तुलनेत वाढ
गतवर्षी जिल्ह्यात ८९ हजार ५१० क्विंटल भात खरेदी झाली होती. त्या तुलनेत यावर्षी १० हजार क्विंटलची वाढ झाली आहे. जिल्ह्यात भातपीक लागवडीखालील क्षेत्र देखील काही प्रमाणात वाढले आहे.
कोट
जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपासून जिल्ह्यातील ३७ केंद्रांवर भात खरेदी सुरू होती. कालपर्यंत ९९ हजार ८३४.५७ क्विंटल भात खरेदी झाली. जिल्ह्यातील ५ हजार ५१६ शेतकऱ्यांनी भात विक्री केली.
- एन. जी. देसाई, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सिंधुदुर्ग
चौकट
फोटो -
तालुकानिहाय भात खरेदी
तालुका*भात क्विंटलमध्ये
कुडाळ*३९ हजार २९७.४०
कणकवली*१९ हजार ६११.६
सावंतवाडी*१४ हजार ३४९.३३
मालवण*७ हजार २५७
वेंगुर्ले*६ हजार १५०.२८
वैभववाडी*६ हजार ८५०
देवगड*३ हजार ७०१.६४
दोडामार्ग*१ हजार ८६०.४०
*दृष्टिक्षेपात....
* जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर भातपीक लागवड
* प्रतिहेक्टरी ३८ ते ५० क्विंटलपर्यंत उत्पादन
* जिल्ह्यात ३७ भात खरेदी केंद्रे
* भात खरेदीत तालुका खरेदी-विक्री संघाचे महत्त्वपूर्ण योगदान
* कुडाळ तालुका भात विक्रीत यावर्षी देखील पहिला
* भात विक्रीतून शेतकऱ्यांच्या खात्यात होणार २० कोटी ३६ लाख ६२ हजार ५२२ रुपये जमा