
दाभोळ ःप्रसिद्ध असाल तर उत्तमरित्या समाजप्रबोधन
फोटो ओळी
-rat१p२७.jpg ःKOP२३L८६१३४
दापोली ः आरजे सोहम यांची मुलाखत घेताना प्रा. ऋजुता जोशी.
प्रसिद्धीमधून उत्तमरित्या समाजप्रबोधन
आर. जे. सोहम ; विषय अभ्यासपूर्ण, खरेपणानेच मांडावा
दाभोळ, ता. २ ः तुम्ही प्रसिद्ध असाल तर तुम्हाला उत्तमरित्या समाजप्रबोधन करता येते म्हणून प्रसिद्ध असणेदेखील महत्वाचे; परंतु प्रसिद्ध होण्यासाठी आपण youtube व insta वर मांडलेला विषय अतिशय अभ्यासपूर्ण आणि खरेपणानेच मांडावा, असे स्पष्ट मत तरुणांच्या हृदयातील आरजे म्हणून ओळख असणारे सोशल मीडिया मास इन्फ्लून्सर आर. जे. सोहम यांनी व्यक्त केले.
कोळथरेतील (कै.) कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानतर्फे आयोजित युवा प्रेरणा कट्टा या कार्यक्रम मालिकेतील तिसरा कट्टा दापोलीतील अर्बन सीनिअर कॉलेजमध्ये झाला. या कट्ट्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर. जे. सोहम उपस्थित होते. त्यानी दिलखुलासपणे सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. काही प्रश्नांना थोड्या हलक्याफुलक्या पद्धतीने उत्तरं देऊन तरुणांची मने जिंकली. सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, चुकीच्या प्रकारे वापर, तरुणांना असणारे व्यसन यावर त्यांची परखड मते मांडली. उपस्थित तरुणाईला सोशल मीडियावरचा प्रेझेन्स, स्वतःचा करिअरमधील संघर्ष, अतिशय कमी वयात मिळालेल उत्तुंग यश याबद्दल सांगून भारावून टाकले.
आरजे सोहम यांनी अतिशय कमी वयात यशाची उत्तुंग शिखरे पार केली असून, केवळ प्रसिद्धीच्या मागे न लागता समाजातील युवावर्गाचे प्रबोधन सोहम करत असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले. सोहम यांची मुलाखत सीए कौस्तुभ दाबके, प्रा. ऋजुता जोशी, डॉ. रवी पवार यांनी घेतली. सूत्रसंचालन प्रा. श्रेयस मेहंदळे यांनी केले व पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे यांनी केले. शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा या कट्ट्याच्या माध्यमातून सर्व युवकांना मिळेल, असा विश्वास या कट्ट्याचे संयोजक संदीप गरांडे यांनी व्यक्त केला आहे.