रत्नागिरी ः जिल्ह्याच्या भूजल पातळीत कमालीची घट

रत्नागिरी ः जिल्ह्याच्या भूजल पातळीत कमालीची घट

जिल्ह्याच्या भूजल पातळीत कमालीची घट
तीव्र पाणीटंचाई शक्य ; राजापुरात पातळी स्थिर
रत्नागिरी, ता. १ ः जिल्ह्याच्या भूजल पातळीत कमालीची घट झाल्याचे जानेवारीतील अहवालातून पुढे आले आहे. अजूनही तीन महिने उन्हाळा असून, यंदा एक महिना आधीच उष्णतेच्या लाटेला आरंभ झाला आहे. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणीपातळीत 0.09 मीटरने घट झाली आहे.
भूजल विभागाकडून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर अशी चारवेळा पाणीपातळी तपासली जाते. त्यासाठी जिल्ह्यातील 63 विहिरी निश्चित केलेल्या आहेत. पाणीपातळीच्या नोंदी घेतल्यानंतर मागील पाच वर्षांच्या पातळीशी तुलना सरासरी काढली जाते. त्यावरून टंचाई तीव्रतेचा अंदाज बांधला जातो. जानेवारी 2023 मध्ये घेतलेल्या नोंदीत रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणीपातळीत सरासरी 0.09 मीटरने घट झाली आहे. फक्त राजापूर तालुक्यातील पाणीपातळी स्थिर आहे. उर्वरित आठ तालुक्यात भूजल पातळीत घट झालेली दिसते. पाऊस लांबला असला तरीही ऑक्टोबर महिन्यात तीव्रता कमी झाली. त्याबरोबरच थंडीचा कालावधीही कमी राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन, पाणी वेगाने जमिनीत मुरणे यासारखे प्रकार यंदा घडले आहेत. पावसावरच पाणीसाठे अवलंबून असतात तसेच भूगर्भातील पाण्याचा उपसाही वाढला आहे.
मार्चच्या सुरवातीलाच अनेकांच्या विहिरीची पाणीपातळी कमी झाली आहे. नदीकिनारी परिसरातील विहिरींचे पाणी अजूनही स्थिर आहे. उन्हाळा तीव्र असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढेल, असा अंदाज आहे. आताच अनेक विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. दरम्यान, गतवर्षी जानेवारी महिन्यात घेतलेल्या नोंदीमध्ये खेड, गुहागर, संगमेश्‍वर आणि लांजा या तालुक्यातील पाणीपातळी घट होती. यंदा राजापूर वगळता सर्वच तालुक्यातील पातळी कमी झालेली आहे.

चौकट 1
बंधारे बांधून पाणी साठवा
पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सिमेंट बंधारे, समतोल पाणलोट विकास, तलावातील गाळ काढणे, ओढ्यावर हंगामी बंधारे, जुन्या विहिरींची खोदाई या उपाययोजनांवर भर दिला आहे. गावातील जुने जलस्रोत दुर्लक्षित आहेत. लोकसहभागातूनच कच्चे बंधारे उभारून पाणीस्रोतांची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे लागणार आहे.
----
चौकट 2
* पाणीपातळीची स्थिती (मीटरमध्ये)
*तालुका*पाच वर्षांची सरासरी*जानेवारी*पातळीतील घट/वाढ
* मंडणगड*2.52*2.66*- 0.14
* दापोली*3.61*3.87*- 0.26
* खेड*2.83*2.95*- 0.12
* चिपळूण*3.90*3.97*- 0.07
* गुहागर*7.64*7.69*- 0.05
* संगमेश्वर*6.55*6.61*- 0.06
* रत्नागिरी*8.39*8.48*- 0.09
* लांजा*8.32*8.34*- 0.02
* राजापूर *5.73*5.73*- 0.00

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com