सावंतवाडीतील करवाढीविरुध्द घंटानाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील करवाढीविरुध्द घंटानाद
सावंतवाडीतील करवाढीविरुध्द घंटानाद

सावंतवाडीतील करवाढीविरुध्द घंटानाद

sakal_logo
By

swt१९९.jpg
८६०८३
सावंतवाडी : येथील प्रांत कार्यालयासमोर घंटानाद करताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवक व नागरिक (छायाचित्र ः रुपेश हिराप)

सावंतवाडीतील करवाढीविरुध्द घंटानाद
प्रांत कार्यालयासमोर घोषणाः साळगावकरांसह माजी नगरसेवक सहभागी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः येथील पालिका प्रशासनाने केलेली अन्यायकारक करवाढ रद्द करावी, अशा घोषणा देत आज येथील प्रांत कार्यालयासमोर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवक व नागरिकांनी घंटानाद आंदोलन करून लक्ष वेधले. ही करवाढ रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सावंतवाडी पालिकेकडून अर्थसंकल्पात पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढवून एक प्रकारे शहरातील नागरिकांना शॉक देण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात २६ टक्केपेक्षा जास्त घरपट्टी वाढ करता येत नसल्याने त्याला पर्याय काढत ज्या मातीच्या घरांना २५ रुपये घरपट्टी होती, त्यांना थेट ४०० रुपयांपर्यंत घरपट्टी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर पाणीपट्टी सुद्धा प्रति युनिट तीन रुपये वाढविण्यात आली. शासनाच्या या कारभाराबाबत साळगावकर यांनी कालच आपली भूमिका स्पष्ट करून यासंदर्भात आवाज उठविण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी या संदर्भात प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते रजेवर असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रांत कार्यालयासमोरच उपस्थितांना घेऊन घंटानाद आंदोलन केले. अन्यायकारक पाणीपट्टी आणि घरपट्टी दरवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी दिल्या. जोपर्यंत ही दरवाढ मागे घेतली जात नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असेही साळगावकर यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, अफरोज राजगुरू, रवी जाधव, उमेश खटावकर, महेश पेडणेकर, जिगर मेमन, शेखर सुभेदार, समीरा खलील आदी नागरिकही उपस्थित होते.
..................
swt११०.jpg
86089
सावंतवाडी : मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करताना रुपेश राऊळ व पदाधिकारी (छायाचित्र ः रुपेश हिराप)

पाणीपट्टी दरवाढीसंदर्भात
जनसुनावणीतून निर्णय घ्या
ठाकरे गटः मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः येथील पालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी दरात केलेली वाढ सध्याच्या महागाई काळात नागरिकांवर अन्यायकारक आहे. यासंदर्भात पालिकेने जनसुनावणी घेऊन दरवाढीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने पालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली.
उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी दरवाढीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. दरवाढ का केली, याबाबत मुख्याधिकारी जावडेकर यांनी विवेचन केले. घरपट्टीवाढीबाबत नगरपंचायत आयुक्तांचे पत्र आहे. त्यांनी दरवाढ करण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार ही दरवाढ करण्यात आली आहे. पाणीपट्टी दरवाढीबाबत २०२१ ला शासनाचे तसे निर्देश होते; असे असताना दोन वर्षांनी पाणीपट्टीत दरवाढ केली आहे. ही दरवाढ ११ रुपयांवरून ३ रुपयांची म्हणजे १४ रुपये करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार दरवाढ करण्यात आली आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. तर ठाकरे गट शिष्टमंडळाने जोपर्यंत नवनियुक्त लोकप्रतिनिधीं पालिकेवर नियुक्त होत नाहीत तसेच जोपर्यंत जनसुनावणी घेण्यात येत नाही, तोपर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी दरवाढीचा निर्णय घेऊ नये. या निर्णयाला तत्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी चंद्रकांत कासार, डॉ. जयेंद्र परुळेकर, मायकल डिसोजा, बाळा गावडे, जयंत परुळेकर, शब्बीर मणियार, श्रुतिका दळवी आदी उपस्थित होते.