
राजापूर ः नायब तहसीलदारांवर बिबट्याचा हल्ला
पान १ साठी
८६२२६
नायब तहसीलदारांवर बिबट्याचा हल्ला
राजापुरात थरार; दुचाकीचा केला पाठलाग; शहरात भीतीचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित यांच्यावर या परिसरातील भटाळी येथील पोलिसलाईनच्या बाजूला बिबट्याने हल्ला केला. मंगळवारी (ता. २८) रात्री घडलेल्या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. कायमच वर्दळ असलेल्या लोकवस्तीतील परिसरामध्ये घडलेल्या प्रकारामुळे येथे भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्ला झालेल्या त्या ठिकाणाचा पंचनामा केल्याची माहिती घाटगे यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पंचायत समितीच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी निवासी नायब तहसीलदार पंडित या काल रात्री दुचाकीने जात होत्या. पोलिसलाईनपासून पुढे काही अंतरावर आल्या असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. त्यामध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी दुचाकी जोरात पळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. यामध्ये त्या बालंबाल बचावल्या असल्या तरी बिबट्याने मारलेला पंजा आणि दुचाकीवरून पडल्याने त्या जखमी झाल्या. या मार्गावरून जात असलेल्या पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ पंडित यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवले आहे.
शहरातील भटाळीकडून पुढे पोलिसलाईनकडून जाणाऱ्या कोदवली रस्त्यावर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मध्यरात्री बिबट्याकडून दुचाकीस्वाराचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या परिसरात वनविभागाने रात्रीची गस्तही सुरू केली. काहीवेळा दिवस-रात्री हा बिबट्या अनेकांच्या नजरेस पडत आहे. काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा बिबट्याने पाठलाग केल्याचेही चर्चिले जात आहे. त्यानंतर, काही नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली व या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्याची दखल घेऊन वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांसमवेत रात्रीची गस्तही सुरू ठेवली होती. काही ठिकाणी बिबट्याच्या संभाव्य हल्ल्याच्या अनुषंगाने योग्य ती काळजी घेण्याची सूचना देणारे फलकही लावलेले आहेत. लोकवस्तीतील आणि रहदारीच्या रस्त्यावर बिबट्याकडून झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे या परिसरामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाच ट्रॅप कॅमेरे लावणार
शहरातील भटाळी परिसरात नेमक्या किती बिबट्यांचा वावर आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी परिसरामध्ये वनविभागाकडून पाच ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सोबत रात्रीची गस्तही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘बिबट्यांची संख्या निश्चित झाल्यानंतर या परिसरात पिंजरा लावायचा की नाही, याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे लोकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे वनविभागाने ग्रामस्थ्यांच्या साथीने गस्त सुरू ठेवली आहे. भविष्यातही ही गस्त कायम ठेवण्यात येणार आहे.’’