
शेती, दुग्धोत्पादनातून प्रगती साधा
swt२१.jpg
८६३४४
कलंबिस्त ः जिल्हास्तरीय कृषी व दूध पशुसंवर्धन शेतकरी संवाद मिळाव्यात बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक डी. एस. दिवेकर. बाजूला नाबार्डचे अजय थुटे, सरपंच सपना सावंत, रवींद्र मडगावकर, अजित अडसूळ, लक्ष्मण खुरकुटे, डॉ. अजित मळीक, रामचंद्र सातार्डेकर, प्रमोद बनकर, ॲड. संतोष सावंत, सुरेश पास्ते, प्रमोद नाईक आदी.
शेती, दुग्धोत्पादनातून प्रगती साधा
डी. एस. दिवेकर ः कलंबिस्तला शेतकरी संवाद मेळाव्यास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः कृषी व पशुसंवर्धन खात्यामध्ये आता पारदर्शकता आली आहे. त्यामुळे विविध शासन योजनांचा लाभ शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांनी घ्यावा. २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून केंद्राने जाहीर केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे. शेतीसह दुग्धोत्पादनाकड़े व्यवसाय म्हणून पाहा आणि चौकस होऊन अधिकाधिक प्रगती साधा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक डी. एस. दिवेकर यांनी केले.
कलंबिस्त ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत व कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यावसायिक संस्था, श्री देवी पावणाई रवळनाथ फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास जिल्हास्तरीय शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन दिवेकर यांनी दीपप्रज्वलनाने केले. व्यासपीठावर नाबार्डचे अधिकारी अजय थुटे, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी अजित अडसूळ, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, सहकार विकास महामंडळाचे संतोष चाळके, ''स्मार्ट''चे मॉडल अधिकारी रामचंद्र सातार्डेकर, लक्ष्मण खुरकुटे, रवींद्र मडगावकर, ॲड. संतोष सावंत, प्रमोद नाईक, रमेश सावंत, लक्ष्मण राऊळ, अनिल शिखरे, भगवंत गावडे, अजित मळीक, श्री. आरोसकर, प्रमोद कदम, दीपक जाधव, दत्ताराम कदम, दिनेश सावंत, कुसाची सावंत, श्याम राऊळ, अशोक राऊळ, गजानन राऊळ, गुरू राऊळ, बाळा राजगे, जीवन लाड, प्रशांत देसाई, श्री. धोंड, ग्रामसेवक बाळासाहेब फुंदे, कृषी सहाय्यक छाया राऊळ, अनमोल गावडे, रेश्मा तुळसकर, अक्षय खराडे, श्री. साखरे, मीनल जंगम, मंदार जंगम, सिद्धेश सावंत, स्वप्नील सावंत, राजू बिडये आदी उपस्थित होते.
दिवेकर पुढे म्हणाले, "योग्य वेळी शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेला मेळावा स्तुत्य उपक्रम आहे. केंद्र आणि राज्याच्या विविध कृषी, पशुसंवर्धन तसेच पाणी सिंचन आदी योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. शेतीकडे पारंपरिक आणि फावल्या वेळेतले काम म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून त्याकडे पाहा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उत्पन्नवाढीच्या विविध योजना आहेत. त्यांचा लाभही घ्यायला हवा. कृषी विभागातील सुविधेमुळे कितीही योजनांसाठी एकाच वेळी अर्ज करू शकता. तुम्हाला निश्चितपणे आवश्यक योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे शासकीय कारभारात पारदर्शकता आली आहे. शेतकऱ्यांनी चौकस होऊन शेती व दूध व्यवसायाकडे पाहावे. सिंधुरत्न योजनेच्या योजनांचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठीचे अर्ज भरण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील."
नाबार्डचे श्री. थट्टे म्हणाले, "नाबार्डच्या योजना आणि सबसिडीच्या मागे न धावता शेती व पशुसंवर्धनातून प्रगती साधा. बँकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जांचा लाभ घेऊन शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य द्या. शेती व शेतीला पूरक म्हणून दूध व्यवसायाकडे लक्ष द्या. जिल्ह्यात बारमाही कलिंगण पीक आता घेतले जात असून हा एक व्यवसाय झाला आहे. त्याचप्रमाणे दुग्धव व्यवसायातही यश मिळेल. तरुणांनी केवळ शिक्षणातच न राहता एखादा व्यवसाय किंवा शेतीकडे वळावे." डॉ. मळीक व ''गोकुळ''चे शिखरे यांनी शासनाच्या योजना तसेच विविध बँकांमार्फत दिला जाणाऱ्या कर्ज योजनांबाबत मार्गदर्शन केले. मडगावकर, सातार्डेकर, खुरकुटे, चाळके, कदम आदींनी शासनाच्या कृषी पशुसंवर्धन सहकार नाबार्ड स्मार्ट योजना याबाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी बनकर यांनी हा मेळावा गावातील शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. आभार हेमंत गावडे यांनी मानले.