पोलिस भरती प्रक्रियेसाठी यादी प्रसिध्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस भरती प्रक्रियेसाठी यादी प्रसिध्द
पोलिस भरती प्रक्रियेसाठी यादी प्रसिध्द

पोलिस भरती प्रक्रियेसाठी यादी प्रसिध्द

sakal_logo
By

पोलिस भरती प्रक्रियेसाठी यादी प्रसिध्द
आक्षेप नोंदविण्यास मुदत ः ९९ जागांसाठी ११८८ उमेदवार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील २०२१ मधील रिक्त कॉन्स्टेबल पदांसाठी मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे एकास दहा याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ९९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात असून एकूण ११८८ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात खुल्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांची यादी ४० गुणांवर, तर महिला उमेदवारांची यादी ३३ गुणांवर थांबली आहे. या यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस दलातील चालक व कॉन्स्टेबल या रिक्त पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबविली जात आहे. २०२१ मधील रिक्त पदांच्या आधारे ही प्रक्रिया राबविली जात आहे. चालक पदाच्या २३ जागांसाठी २ हजार १२६, तर कॉन्स्टेबल पदाच्या ९९ जागांसाठी ५ हजार ९५८ अर्ज आले होते. यातील चालक पदासाठी २ ते ४ जानेवारी कालावधीत, तर कॉन्स्टेबल पदासाठी ५ ते ११ जानेवारी या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली. यावेळी उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे एकास दहा याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी प्रवर्ग व समांतर आरक्षण निहाय निवड यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी www.mahapolice.gov.in आणि www.sindhudurgpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लेखी परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेल्या ११८८ उमेदवारांच्या यादीत ९३१ पुरुष उमेदवारांची नावे आहेत. ५९ माजी सैनिक, तर १९६ महिला उमेदवारांची नावे आहेत. मैदानी परीक्षेसाठी एकूण ५० गुण होते. त्यात मिळालेल्या गुणांवर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात ओबीसी आरक्षणमध्ये पुरुषांची २८, तर महिलांची २५ गुणांवर यादी थांबली आहे. ''ईडब्लूएस''मध्ये पुरुष २६ आणि महिला २५ गुणांवर यादी थांबली आहे. एससीमध्ये पुरुष २७ आणि महिला २५, एसबीसी पुरुष २५ आणि महिला २८, एनटी-बी पुरुष ३२ आणि महिला २७, एनटी-सी पुरुष ३६ आणि महिला २८, व्हीजे-एमध्ये २८ गुणांवर ही यादी थांबली आहे. खुल्या प्रवर्गातील पुरुषांची यादी ४० वर, तर महिलांची यादी ३३ गुणांवर यादी थांबली आहे. तर माजी सैनिकांमध्ये ५९ उमेदवारांची निवड करण्यात आली असून कमीत कमी ३४ गुण मिळालेल्या उमेदवारांची निवड असलेली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

चौकट
लेखी तक्रार करण्याचे आवाहन
प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत पोलिस पाल्य, प्रकल्पग्रस्त, होमगार्ड, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ यांच्यासाठी आरक्षित उमेदवारांची सुद्धा निवड केली आहे. दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या यादीवर आक्षेप असल्यास ७ मार्चपर्यंत sp.sindhudurg@mahapolice.gov.in या ई-मेलवर अथवा पोलिस नियंत्रण कक्ष येथे समक्ष लेखी स्वरुपात तक्रार करण्यात यावी. नंतर आलेली तक्रार विचारात घेतली जाणार नाही, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.