रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम

रत्नागिरी ः शहरातील जी. एफ. पायपिंग सिस्टीम कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून कोल्हापुरातील स्वयंसिद्धा व डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकासांतर्गत मार्चपर्यंत २० कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या व्यवस्थापक विश्वस्त कांचन परूळेकर यांनी दिली.
रत्नागिरी एमआयडीसीतील जी. एफ. पायपिंगतर्फे मार्च २०२३ पर्यंत प्रत्येक तालुक्यात २० कार्यक्रम होतील. सीएसआर प्रमुख नम्रता कांबळी व परिसर विकास अधिकारी स्वप्नील कदम यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. आतापर्यंत राजापूर नाटे येथे पापड, ड्राय स्नॅक्स, कुवारबावला फ्रोजन फूड, सडामिऱ्या फळप्रक्रिया, पावसला ड्रायक्लिनिंग, देवरूखला बांधणी, दापोली केळशीत फ्रोजन फूड, ड्राय स्नॅक्स अशी प्रशिक्षणे महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाली आहेत. लांजा, राजापूर, चिपळूण, मंडणगड, खेड, गुहागर येथे प्रशिक्षणं मार्चअखेर पूर्ण केली जातील. तीन तासात हसतखेळत दिलेल्या प्रशिक्षणातून उद्योजिका, प्रशिक्षिका, विक्रेती उभी राहू शकते. घरखर्च वाचवण्यायोग्य दर्जेदार, विनाभेसळ वस्तू घरासाठी तयार करता येतात.

जिल्हाधिकाऱ्यांकडून
तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त ३ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी, रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांनी २०२३ या वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा महसूल हद्दीकरिता ६ मार्चला होळी,
१८ सप्टेंबरला हरितालिका पूजन, २२ सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन हे दिवस स्थानिक सुट्ट्यांचे दिवस म्हणून जाहीर केले आहेत.


परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी
६ मार्चला राहणार उपस्थित
रत्नागिरी ः जिल्ह्यात ६ मार्चला होळीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे; परंतु सोमवारी ६ मार्चला १०वीचा इंग्रजी या विषयाचा व १२ वीचा सहकार या विषयाचा पेपर असल्याने परीक्षांशी संबंधित पुढील यंत्रणांनी ६ मार्चला कर्तव्यावर उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेशित केले आहे. शिक्षण विभाग (माध्यमिक), गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सर्व नियुक्त परिरक्षक व सहाय्यक परिरक्षक तसेच त्यांनी नियुक्त केलेला कर्मचारीवर्ग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियुक्ती केलेली सर्व भरारी पथके व त्यातील सदस्य, कोकण बोर्ड रत्नागिरीकडून नियुक्त केलेली सर्व भरारी पथके व त्यातील सदस्य, परीक्षेशी संबंधित पोलिस यंत्रणा व आरोग्यकेंद्र, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त केलेले वीज वितरण कर्मचारी, जिल्हास्तरीय दक्षता समिती व तहसील कार्यालयातून परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी या यंत्रणांनी ६ मार्चला उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.
-----
काँग्रेसकडून पालिकेला
कर वाढीविरुद्ध निवेदन
रत्नागिरी ः पालिकच्या अनागोंदी कारभाराबाबत काँग्रेसने आवाज उठवला आहे. नियोजनशून्य कारभार करून सामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. ज्याची घरपट्टी १९०० ते २५०० येत होती त्यांना अचानक ३९ हजार अशा मागणीच्या पावत्या पाठवल्या आहेत. वृक्ष कर, शिक्षणकर, सुशोभीकरण कर अशा अनेक नियोजनशून्य कराचा भरणा करून समान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. हा सामान्य जनतेचा होणारा छळ त्वरित थांबवावा अन्यथा पालिकेच्या विरुद्ध आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा ॲड. अश्विनी आगाशे यांनी दिले. अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आले. या प्रसंगी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख, मीडिया प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, संध्या कोसुंबकर, साजिद पावसकर, श्वेता फाळके, सीमा राणे, अमित बनसोडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.