मंडणगड - वर्धानमातेची ढालकाठी मंडणगड शिमगोत्सवाचा केंद्रबिंदू

मंडणगड - वर्धानमातेची ढालकाठी मंडणगड शिमगोत्सवाचा केंद्रबिंदू

फोटो ओळी
- rat२p७.jpg ःKOP२३L८६३०३ शेवरे ः शिमगोत्सवाचा केंद्रबिंदू असणारी मंदिरासमोर सजवलेली वर्धानमातेची ढालकाठी व शेवरे ग्रामस्थ.
-rat२p८.jpg ः KOP२३L८६३०४ वर्धानमातेची ढालकाठी नाचवताना भाविक.


वर्धानमातेच्या उंच ढालकाठीचा ८४ गावात प्रवास

शेवरेचा शिमगोत्सव; देवीचे पुरातन मंदिर, टोकावर चांदीचा कळस व देवीचा ध्वज
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३ ः तालुक्यातील शेवरे गावाची ग्रामदेवता वर्धानमातेची ढालकाठी मंडणगड तालुक्यातील शिमगोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. ५० फूट उंचीच्या ढालकाठीवर आरूढ झालेली देवी ८४ गावांतून प्रवास करते. नवसेवाली बाय अशी ख्याती असणाऱ्या शेवरे गावच्या ग्रामदेवतेचा शिमगोत्सव सर्वार्थाने वेगळा आणि ठसठशीत ठरतो. शेकडो वर्षांची परंपरा असणारी तालुक्यातील ही एकमेव ढालकाठी असून सर्वांनाच तिचे आकर्षण आहे.
शेवरे हे मंडणगड तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. पायथ्याजवळून वाहणारी बारमाही भारजा नदी. गावाच्या माथ्यावर नवसाला पावणाऱ्या वरदान माता देवीचे पुरातन काळातील मंदिर आहे. दोन वर्षांपूर्वी मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला. यात वर्धानमाता, मानाई, झोलाई, वाघजाई, भैरी, चनकाई यांची स्थाने आहेत. शिमगोत्सवात दुसऱ्या होळीला आणलेल्या ५० फूट उंच बांबूच्या काठीची पूजा करण्यात आली. तिला ढालकाठी असे म्हणतात. तिला रंगीबेरंगी कपड्यांनी सजवण्यात आले. टोकावर चांदीचा कळस व गावदेवीचा भगवा ध्वज लावण्यात आला आहे. परंपरेनुसार काठी वर्धानमाता देवीच्या प्रांगणात उभी करून गावातील सर्व लहानथोर मंडळीसह देवीचे पुजारी यांनी पूजन केले. त्यानंतर मंदिरातील देवीसमोरील एक फूल आणून ढालकाठीची पूजा केली. या पुजेनंतर देवी ढालकाठीवर आरूढ होत असल्याची गावकऱ्यांची श्रद्धा आहे. देवीचे खेळी ढालकाठी घेऊन ८४ गावांच्या भेटीला निघाली आहे. डोंगरदऱ्यातून पायवाटा तुडवत अनेक अडथळे पार करत हा प्रवास सुरू असतो. तालुक्यातील वाडी कोंडावर येथे तिचे जल्लोषात भक्तिभावाने स्वागत करण्यात येते. दरम्यान, नवसाची प्रथा जोपासताना काठीसमोर लहान मुलाला आंघोळ घातल्यास त्रास होत नाही, असा समज आहे.

आठव्या होळीला शेवरेत आगमन
सात दिवसांच्या गावभेटीनंतर आठव्या होळीला रात्री वाजतगाजत पुन्हा शेवरे गावी मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे. गावात फिरल्यानंतर धुळवडीला ढालकाठी नाचवत देवीच्या देवळासमोर नेण्यात येते. या ठिकाणी जुने नवस पूजा करून फेडले जातात. पुजारी, मानकरी काठीची पूजा करून काठीसमोरील फूल देवीसमोर नेऊन ठेवले जाते. असे केल्याने सात दिवस भ्रमंती करणारी देवी पुन्हा आपल्या जागी आरूढ होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com