
नडगिवे इंग्लिश मीडियममध्ये मराठी भाषा दिन उत्साहात
swt215.jpg
86418
नडगिवे ः मराठी भाषा दिनानिमित्त मार्गदर्शन करताना कवयित्री अनुराधा दीक्षित.
नडगिवे इंग्लिश मीडियममध्ये
मराठी भाषा दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २ः मराठीला आता जगातही मान्यता प्राप्त झाली आहे. याचे श्रेय संत महात्मे, छत्रपती शिवाजीराजे, मराठी शब्दकोश निर्माते, साहित्यिकांना आणि अनेक मराठी प्रेमींना आहे. कवी कुसुमाग्रजांसह साहित्यिकांनी आपल्या लेखनातून मराठीचा एक वेगळा ठसा उमटविला, असे प्रतिपादन प्रसिध्द कवयित्री अनुराधा दीक्षित यांनी केले. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, नडगिवे येथे मराठी राजभाषा दिनी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पराग शंकरदास, विद्यालयाचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या गौरवार्थ मराठीचे महत्त्व प्रतिपादन करणारे गुणगान केले. कुसुमाग्रजांच्या काही कवितांचे वाचन केले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठीबद्दल प्रेम व्यक्त केले. शिक्षकेतर कर्मचारी अनिल कर्ले यांनी मराठी गीत सादर केले. सहशिक्षिका संपदा पाटील यांनी मराठीचा आपल्या बोलण्यातून व लेखनातून प्रसार करण्याचे आवाहन केले. कलाशिक्षक उदय दुधवडकर यांनी साहित्य लेखनाकडे वळून मराठीचा प्रसार करावा. मराठी वाक्यरचनेत इंग्रजीचा वापर टाळावा, असे आवाहन केले. मराठी भाषेची महती प्रतिपादन करणारी स्वरचित कविता सादर केली. मुख्याध्यापक देसाई यांनी विविध साहित्य व संगीत यांच्या अविष्कारातून मराठीचा गौरव करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन सहशिक्षक ओंकार गाडगीळ यांनी केले. आभार सहशिक्षिका तेजश्री भोकरे यांनी मानले.