
देवगडातील परिक्षा केंद्रांना पोलीस निरीक्षकांनी दिली भेट
swt220.jpg
86423
देवगड ः येथील परीक्षा केंद्राला पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी भेट देऊन माहिती घेतली.
देवगडातील परिक्षा केंद्रांना
पोलीस निरीक्षकांनी दिली भेट
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ः शालेय शिक्षणाची पुढील दिशा ठरवणारी महत्वाची मानली जाणारी शालांत परीक्षा (दहावी) आजपासून सुरू झाली. तालुक्यात विविध परीक्षा केंद्रावर परीक्षेला प्रारंभ झाला. यामुळे पालकांचीही धावपळ वाढली आहे. येथील पोलीस ठाणे हद्दीतील दहावी परीक्षेकरिता असलेल्या पाचपैकी दोन परीक्षा केंद्रांना पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी भेट देऊन माहिती घेतली.
येथील पोलीस ठाणे हद्दीत परीक्षेची एकूण पाच केंद्रे आहेत. यामध्ये येथील शेठ म. ग. हायस्कुल, शिरगाव हायस्कुल, वाडा हायस्कुल, मिठबाब हायस्कुल, सांडवे हायस्कुल यांचा समावेश आहे. यातील देवगड आणि वाडा केंद्राला पोलीस निरीक्षक श्री. बगळे यांनी आपल्या सहकार्यांसह भेट दिली. येथील शेठ म. ग. हायस्कुल केंद्रावर एकूण ३७४ विद्यार्थी परिक्षेकरीता बसलेले आहेत. श्री. बगळे यांनी मुख्याध्यापक संजीव राऊत यांची भेट घेतली. देवगड परीक्षा केंद्रावर एक होमगार्ड नियुक्त करण्यात आला आहे. वाडा हायस्कुल येथील केंद्रावर एकूण १९६ विद्यार्थी परिक्षेकरीता बसलेले आहेत. तेथील मुख्याध्यापक नारायण माने यांची श्री. बगळे यांनी भेट घेतली. वाडा केंद्रावरही एक होमगार्ड नियुक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आज दुपारी पेपर संपल्यानंतर आपल्या पाल्याला घरी नेण्यासाठी येथील परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी झाली होती. आज पेपरचा पहिला दिवस असल्याने उत्साही वातावरण होते.