
रत्नागिरी - उत्पादन शुल्कच्या नवीन इमारतीला प्रशासकीय मंजुरी
उत्पादन शुल्कच्या
नवीन इमारतीला मंजुरी
११ कोटी ३ लाखाचा आराखडा; जी प्लस वनमध्ये सर्व सुविधा
रत्नागिरी, ता. २ ः येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला लवकरच नवीन इमारत मिळणार आहे. या विभागाच्या ११ कोटी ३ लाखाच्या आराखड्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. जी प्लस वन अशी भव्य इमारत उभी केली जाणार आहे. या इमारतीत एकाच ठिकाणी अधीक्षकांसह रत्नागिरी शहर, ग्रामीण व भरारी पथकाच्या निरीक्षकांची कार्यालये, कोठडी, मुद्देमालासाठी स्वतंत्र हॉल असणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग सध्या हे अधिकारी दोन वेगवेगळ्या जुन्या इमारतींमध्ये असणाऱ्या अपुऱ्या सोयी-सुविधांसह छोट्या केबिनमध्ये दाटीवाटीने बसून कामकाज करत आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या प्रमुखांचा कौलारू इमला १८२५ च्या कालावधीतील आहे. या कौलारू इमारतीचे अधुनमधून मजबुतीकरण आणि नूतनीकरण करून सुशोभित ठेवण्यात आले आहे. याच ठिकाणी मागे शेड काढून शहर निरीक्षकांचे काम चालते. याच ठिकाणी सध्या उत्पादन शुल्क अधीक्षक आणि त्यांचा प्रशासकीय स्टाफ कार्यरत आहे. सध्या ही इमारत फारच जीर्ण झाली आहे. त्यानंतर १९७७ ला भरारी पथक आणि ग्रामीण निरीक्षकांच्या केबिन आहेत. याच इमारतीत आरोपींना ठेवण्यासाठी असलेल्या कोठडीत जिल्हा भरारी पथकाच्या निरीक्षक केबिनची सोय करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या या कार्यालयाजवळ पोलिस अधीक्षक निवासस्थान आहे. शासनाने उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन इमारत आराखड्याला प्रशासकीय मंजुरी दिल्याने या विभागाला दिलासा मिळाला आहे.