
श्री क्षेत्र टेरव येथे 7 मार्चपासून साजरा होणार शिमगोत्सव
rat०२४६.txt
बातमी क्र..४६ (पान ५ साठी)
फोटो ओळी
-rat२p३९.jpg ः
८६४५६
चिपळूण ः टेरव येथील कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई.
--
टेरवच्या भवानी-वाघजाईचा मंगळवारी शिमगोत्सव
चिपळूण, ता. ३ः निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात मंगळवार (ता.७) पासून साजरा होणार आहे. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ तसेच पुजारी यांच्याकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
सोमवारी (ता. ६) रात्री हुताशनी पौर्णिमेला वाडी-वाडीतील ग्रामस्थ पूजन करून होळी प्रज्वलित करतील. ७ ला सकाळी कुलस्वामिनी श्री भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ व गवत इत्यादीने सजवलेल्या होमाची पुजारी पारंपरिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधीवत पूजा करून घेतील. गावचे पुजारी (गुरव) मंदिरातून पालखी सजवून कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांची रूपे लावून मंदिरा व होमासमोरील मानाच्या नूतन सहाणेवर आसनस्थ होईल. सकाळी ९ वा. ढोलताशे व वाजंत्र्यासह होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलित करून ग्रामस्थ होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण करतील. होमाभोवती पालखीची प्रदक्षिणा घालताना भैरी-केदाराच्या चांगभलं असे म्हणून पालखी उंचावून उपस्थित भाविकांना दर्शन दिले जाते. हा क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. सुवासिनी सहाणेवर पालखीत देवीच्या ओट्या भरतील व नंतर पालखी मंदिरात स्थानापन्न होईल.
संध्याकाळी ४ वा. पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात येईल. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा छबिना काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजतगाजत रात्री मंदिरात आणली जाईल. ८ ला पालखी प्रथम गावच्या दोन मानकऱ्यांच्या घरी नेली जाईल व नंतर निम्मेगाव येथे घरोघरी नेण्यात येईल.
या कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.