
कुंभवडेत गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर
86471 - जखमी भारती गावडे
86472
कुंभवडे (सावंतवाडी) ः येथे गुरुवारी सकाळी गव्याच्या हल्ल्यात जखमी भारती गावडे यांना आधार देताना ग्रामस्थ.
कुंभवडेत गव्याच्या
हल्ल्यात महिला गंभीर
सावंतवाडी, ता. २ ः काजू बागेत कामाला जाताना कुंभवडे येथील जंगलात गव्याने हल्ला केल्याने आज एक महिला गंभीर जखमी झाली. भारती भरत गावडे (वय ४० रा. चौकुळ-कुंभवडे) असे त्यांचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेआठच्या दरम्यान घडली. त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ः चौकुळ-कुंभवडे येथील भारती अन्य महिलांसह काजू बागेत कामासाठी जात होत्या. त्या एकट्याच पुढे जंगलातील वाटेने चालत असताना अचानक गव्याने हल्ला केला. यात त्यांचे डोके नजीकच्या झाडाला आदळल्याने गंभीर दुखापत झाली. छातीला व पायालाही दुखापत झाली. त्या तेथेच पडलेल्या होत्या. मागून येणाऱ्या ग्रामस्थांना रस्त्यात भारती यांची बॅग पडलेली दिसली. त्यांनी आजूबाजूला पाहिले असता झाडाखाली त्या जखमी अवस्थेत दिसून आल्या. गव्याने हल्ला केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हल्ल्यात भारती यांच्या गळ्यातील मंगळसूत्रही हरवले आहे. ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तत्काळ आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सावंतवाडी उपजिल्हा आणि तेथून ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी म्हणाले, ‘‘घटनास्थळ दोडामार्ग वनक्षेत्रात येते. वनविभागाकडून उपचारासाठी आवश्यक तो खर्च उचलण्यात येणार आहे. पंचनामा करून अन्य काही मदत देता येईल का, या संदर्भातही प्रयत्न करू.’’
चौकुळ परिसरात गव्याकडून हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आधी चौकुळ-केगदवाडी येथील वृद्ध सोनू परब नोव्हेंबरमध्ये गव्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. वन्यप्राण्यांकडून परिसरात हल्ले होत असताना वन विभाग सुरक्षितेच्या दृष्टीने काहीच हालचाली करताना दिसत नाही. यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे.