तोंडवळीवासीयांचे उपोषण तात्पुरते स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोंडवळीवासीयांचे उपोषण तात्पुरते स्थगित
तोंडवळीवासीयांचे उपोषण तात्पुरते स्थगित

तोंडवळीवासीयांचे उपोषण तात्पुरते स्थगित

sakal_logo
By

swt२३०.jpg
८६४९६
तोंडवळीः रस्त्याच्या कामासाठी निधीचे पत्र प्राप्त होताच तोंडवळीवासीयांनी उपोषण स्थगित केले.

तोंडवळीवासीयांचे उपोषण तात्पुरते स्थगित
रस्त्याबाबत आश्वासनः आमदार निधीतून २० लाख मंजूर
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २ ः तोंडवळी येथील रस्त्याबाबत तोंडवळीवासीयांनी कालपासून (ता. १) बेमुदत उपोषण सुरु केले होते. आज स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून २० लाख रुपये मंजूरीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी सरपंच नेहा तोंडवळकर यांना दुपारी उपोषणस्थळी दिले. त्यानंतर तोंडवळीवासीयांनी पुढील तीन महिन्यासाठी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. रस्त्याच्या कामात दिरंगाई झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी रस्त्याच्या मानाने निधी अपुरा असला तरी आवश्यकता भासल्यास आमदार नाईक यांच्यामार्फत निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन यावेळी दिले. भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनीही ग्रामस्थांना फोनवरुन उपोषणास पाठिंबा जाहीर करत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आवश्यकता भासल्यास निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी बाबी जोगी, वासुदेव पाटील, आबा कांदळकर, दिपक कांदळकर, उपसरपंच हर्षद पाटील, संजय केळुसकर, गणेश तोंडवळकर आदी उपस्थित होते.
तोंडवळी येथील वन विभागाच्या जागेतील ६०० मीटर रस्त्यासह एकूण साडे पाच किमीच्या रस्त्यासाठी सुमारे दोन कोटी पेक्षा निधीची आवश्यकता आहे. मात्र, या रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. रस्त्याबाबत निधी उपलब्धता व प्रशासकीय मान्यतेबाबत जोपर्यंत प्रशासकीय पातळीवर लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे तोंडवळी ग्रामस्थांनी सांगत कालपासून उपोषणास सुरवात केली होती. तोंडवळी येथील रस्ताप्रश्नी सरपंच नेहा तोंडवळकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तोंडवळी सुरू बन याठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केले होते. यावेळी उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुजाता पाटील, स्नेहल पाटील, मानसी चव्हाण, अनन्या पाटील, माजी सरपंच आबा कांदळकर, जयहरी कोचरेकर, गणेश तोंडवळकर, संजय केळुसकर, दीपक कांदळकर, वासुदेव पाटील, आशिष पाटील, ताता टिकम, अॅड. ओंकार केणी यांसह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दरम्यान, आज प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही होत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता प्रभू यांनी आमदार नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून २० लाख रुपये निधीचे पत्र सरपंच तोंडवळकर यांना सुपुर्द करुन देत रस्ता कामाबाबत प्रस्ताव सादर करण्यास किमान डांबरीकरणास कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगितले. प्रस्ताव सादर करण्यास निधी नाही तर प्रशासकीय मान्यता हवी होती ती मिळाली. यानंतर पर्यावरण आणि वनविभागाच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करावे लागतील. यादृष्टीने साधारण महिनाभराचा अवकाश लागेल, असे सांगितले. यामुळे ग्रामस्थांनी पुढील तीन महिन्याचा अवकाश देत कामात दिरंगाई झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा देत दुपारनंतर उपोषण तात्पुरते स्थगित केले.