शासन उदासीन; बागायतदारांना फटका

शासन उदासीन; बागायतदारांना फटका

86609
बांदा ः येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना अध्यक्ष विलास सावंत. शेजारी विठ्ठल मोरुडकर, जनार्दन नाईक. (छायाचित्र - नीलेश मोरजकर)

शासन उदासीन; बागायतदारांना फटका

फळबागायतदार संघ; दोन रुपये जास्त दराने काजू बी खरेदी करणार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः शासनाच्या उदासीनतेचा फटका काजू बागायतदार शेतकऱ्यांना प्रामुख्याने बसत आहे. कारखानदार व शेतकरी यांच्यात सरळ व्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे जास्त मिळणे आवश्यक असताना कारखानदारच व्यापाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठे करीत आहेत. त्यामुळे उत्पादनाच्या दीडपट हमीभाव हे पंतप्रधानांचे वचन हवेतच विरले आहे. एकंदरीत कारखानदार व व्यापारी यांच्यात साटेलोटे सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी आम्ही बाजारपेठेतील काजू दरापेक्षा दोन रुपये जास्त दराने काजू बी खरेदी करणार असल्याची माहिती सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनी लिमिटेड व शेतकरी फळबागायतदार संघ सावंतवाडी दोडामार्ग कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. सावंत बोलत होते. यावेळी संघाचे पदाधिकारी विठ्ठल मोरुडकर, जनार्दन नाईक आदी उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, ‘‘जीआय मानांकन मिळविलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बी ची व्यापारी व कारखानदारांकडून अवहेलना होत आहे. त्यामुळे जीआय म्हणून सिंधुदुर्ग काजूगर घेणाऱ्या लाखो ग्राहकांची कारखानदारांकडून फसवणूक होत आहे. गोव्यामध्ये अजूनही उत्पादित होणारी काजू बी ही ८० टक्के अधिक गावठी असते व मोजमाप मात्र १८० ते २०० रुपये काजू बी किलो असते.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘गत चार-पाच वर्षांत १४० ते १८० पर्यंत काजू बि दर होऊनही काजूगरांचा दर मात्र स्थिरच होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल कमी दरात घेऊन प्रचंड नफा कमविण्याकडे व्यापारी कारखानदारांचा कौल आहे. काजू उत्पादन खर्च १२२ रुपये प्रति किलो असताना त्यावर किमान १५ ते २० रुपये ज्यादा मिळून हा दर १४० रुपयांच्या आसपास असल्यास शेतकऱ्यांना परवडेल, तरीही दर कमी करण्याचा डाव व्यापारी व कारखानदारांकडून केला जातो. अनेक कारखानदारांकडून अथवा एक्स्पोर्टकडून हा काजूगर परकीय देशात दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति किलो दराने खपवून प्रचंड नफा कमवला जातो यात मात्र शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले जाते. एकंदरीत पाहिल्यास अनेक तरुण शेतकऱ्यांनी अशा कारणांमुळे इतर पिक उत्पादनाकडे आपला कल वाढवला असून भविष्यात काजू पीक कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फटका मात्र कारखानदारांना नक्कीच बसणार आहे. शासनाने आपली उदासीनता बाजूला ठेवत पंतप्रधानांच्या ‘उत्पादनाच्या दीडपट हमीभाव’ या वचनाला जागावे.’’
------------
चौकट
१६० रुपये दर मिळणे अपेक्षित
बाजारपेठेत जेवढा दर असेल त्याच्यापेक्षा दोन रुपये अधिक दर शेतकरी फळबागायतदार संघाकडून शेतकऱ्यांना देणार. व्यापारी व कारखानदारांमध्ये सुरू असलेले साठेलोटे बंद झाल्यास काजू बागायतदार शेतकऱ्यांना १५० ते १६० रुपये दर मिळणे अपेक्षित असल्याचेही श्री. सावंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com