राजापूर-बारमाही शेतीतून स्वंयपूर्णतेचा ध्यास हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-बारमाही शेतीतून स्वंयपूर्णतेचा ध्यास हवा
राजापूर-बारमाही शेतीतून स्वंयपूर्णतेचा ध्यास हवा

राजापूर-बारमाही शेतीतून स्वंयपूर्णतेचा ध्यास हवा

sakal_logo
By

rat३p१२.jpg, rat३p१३.jpg
86615, 86616
राजापूरः पाण्याचा सदुपयोग करत उन्हाळी शेती गावोगावी होणे गरजेचे आहे.
----------

धरणे आणि विकास- भाग ३ लोगो

बारमाही शेतीतून स्वंयपूर्णतेचा ध्यास हवा
धरणातील पाण्याचा सदुपयोग करणे गरजेचे; व्यावसायिक दृष्टीची गरज
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ः धरणांमधील पाणीसाठा अनेक गावांमधील जमीन ओलिताखाली येण्याच्यादृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. शेतीतून रोजगार निर्मितीही होण्यास साहाय्यभूत ठरणार आहे. त्याचवेळी धरण परिसरातील काही गावांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटण्याची संधी निर्माण होणार आहे. या धरणांमधून होणारे सिंचन, रोजगारनिर्मिती अन् शेतीतून राजापूर तालुका आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास एकप्रकारे मदत होणार आहे. मात्र त्यासाठी धरणाच्या पाण्याचा सदुपयोग करण्याचा लोकांचा सकारात्मक दृष्टिकोनही महत्वपूर्ण ठरणार आहे.
प्रत्येक परिसराच्या विकासामध्ये पाण्याची उपलब्धी महत्वपूर्ण ठरते. मात्र, मुबलक पाण्याच्या दुर्लभामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील क्षेत्र सिंचनाखाली येण्यापेक्षा कोरडे पडू लागले आहे. त्यातून, रोजगाराच्या संधीही कमी दिसत आहे. या स्थितीवर मात करायची असेल तर येथील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येणे गरजेचे आहे. जेणेकरून त्या पाण्यावर आधारित मोठ्या प्रमाणात शेती होऊन त्यातून रोजगाराची निर्मिती होईल. तालुक्यातील अनेक धरणांची कामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये धरण परिसरातील गावांना मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, या उपलब्ध पाण्याच्या साहाय्याने उन्हाळी-पावसाळी अशी बारमाही शेती करून शेतशिवार फुलवण्याची मानसिकता सार्‍यांनी आतापासून तयार करणे गरजेचे आहे.
पाचल, रायपाटण, सौंदळ, तळवडे आदींसह अन्य काही गावांमधील शेतकर्‍यांनी धरणामधील पाणीसाठ्याचा खुबीने उपयोग करत पावसाळ्याच्या जोडीने उन्हाळी शेती करून रोजगार निर्मिती करण्यावर भर दिल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. धरण परिसरातील काही क्षेत्र पावसाळ्याच्या जोडीने उन्हाळ्यामध्येही हिरवेगार झाल्याचे दिसत आहे. मात्र, अशी व्यावसायिक दृष्टी ठेवून शेतशिवार फुलवणार्‍यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यामध्ये भविष्यात वाढ होण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षामध्ये तालुक्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये शेतकर्‍यांकडून नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यापैकी अनेक प्रयोग यशस्वीही झाले आहेत. मात्र या प्रयोगांना व्यावसायिकतेचे स्वरूप प्राप्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांशी थेट संवाद साधून त्यांना नेमक्या कोणत्या सोयीसुविधांची आवश्यकता आहे याची चाचपणी करून त्यांची उभारणी करणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांच्या शेतीतून रोजगार निर्मितीच्या प्रयत्नांना पाठबळ मिळेल.
(समाप्त)

चौकट
रखडलेल्या कामांचा आढावाच घेतलेला नाही
तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या विविध विकासाच्या योजना यांचा वर्षभरामध्ये सातत्याने लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाकडून आढावा घेतला जातो. त्यातून, येणाऱ्या अडचणींवर चर्चेतून मार्ग काढून विकासयोजना मार्गी लावल्या जातात. मात्र, गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या धरणांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय कोणतीही स्वतंत्र आढावा बैठक होताना दिसत नाही. त्यामध्ये ना लोकप्रतिनिधी लक्ष घालत ना ग्रामस्थ आणि प्रशासन. दरवर्षी सातत्याने आढावा बैठका झाल्यास वर्षानुवर्षे कुर्मगतीने सुरू असलेल्या धरणांची विविध स्वरूपाची कामे मार्गी लागण्यास, धरणग्रस्तांचे विविध प्रश्‍न सुटण्यास आणि धरण बांधणीचा मूळ उद्देश सफल होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी सार्‍यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे.