
परीक्षेच्या पहिल्या पेपरला 24 विद्यार्थी गैरहजर
दहावीच्या पहिल्या पेपरला
२४ विद्यार्थी गैरहजर
चिपळुणात परीक्षा शांततेत ; १५ केंद्रावर परीक्षा
चिपळूण, ता. ३ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा गुरुवारी (ता. २) सुरू झाली. चिपळूण तालुक्यात ग्रामीण व शहरी भागातील १५ केंद्रांवर शांततापूर्ण वातावरणात प्रारंभ झालेल्या परीक्षेच्या पहिल्या पेपरला २४ विद्यार्थी गैरहजर होते.
चिपळूण तालुक्यातून मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमाचे एकूण ४ हजार ५५० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. त्यांची १५ परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी मराठी व उर्दू माध्यमाच्या २ हजार ९२१ विद्यार्थ्यांपैकी २४ विद्यार्थांनी पहिल्याच पेपरला दांडी मारली तर केंद्र संचालकांच्या सूचनांचे पालन करत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रावर व एक ते दोन तास अगोदरच हजेरी लावली होती. या विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही गर्दी होती. परीक्षेपूर्वीचा मिळालेला वेळही विद्यार्थ्यांनी अभ्यासात घालवला. एकमेकांना बेस्ट ऑफ लक देत व अनेकांच्या शुभेच्छा स्वीकारत विद्यार्थी पहिल्या पेपरला सामोरे गेले.
चिपळूण तालुक्यात अलोरे हायस्कूल, आंबतखोल हायस्कूल, भोम हायस्कूल, युनायटेड हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, धामणंद (खेड) हायस्कूल, कामथे हायस्कूल, खेर्डी-सती हायस्कूल, रामपूर हायस्कूल, सावर्डे हायस्कूल, वहाळ हायस्कूल, आंबडस (खेड) हायस्कूल, परांजपे हायस्कूल, मिरजोळी हायस्कूल, पेढे हायस्कूल आदी परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा सुरू झाली. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जगदाळे, चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक, नायब तहसीलदार, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी यांच्या पथकाने असुर्डे-आंबतखोल, सावर्डे हायस्कूल, युनायटेड हायस्कूल, परांजपे हायस्कूलला भेट देऊन पाहणी केली तसेच परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित केंद्र संचालकांना केल्या. पहिल्या पेपरला तालुक्यात कोणताही गैरप्रकार घडला नसल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक यांनी दिली.