
‘मोती तलावाकाठीच बाजार भरवा’
86656
सावंतवाडी ः येथील पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर यांना निवेदन देताना फेरीवाले. बाजुला अॅड. संदीप निंबाळकर, महेश परुळेकर. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
‘मोती तलावाकाठीच बाजार भरवा’
हॉकर्स फेडरेशन; सावंतवाडी पालिकेवर मोर्चा, जागा न बदल्यास विरोधा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः येथील मोती तलावाच्या काठावर भरवण्यात येणारा आठवडा बाजार अन्यत्र न हलविता, आहे तेथेच भरवावा. यासंदर्भात कुठलाही निर्णय घेताना फेरीवाल्यांना विश्वासात घ्या, अशी प्रमुख मागणी सिंधुदुर्ग जिल्हा हॉकर्स फेडरेशनच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाल्यांनी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर यांना सुपूर्त केले.
व्यापाऱ्यांत भांडण लावून राजकीय पोळी कुणी भाजू नये, असा इशाराही अॅड. निंबाळकर यांनी दिला.
येथील मोती तलावाच्या काठावर भरणाऱ्या आठवडा बाजार शहरातील होळीचा खुंट या ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आठवड्या बाजारावर पुन्हा एकदा मतभेद सुरू झाले आहेत. अलीकडेच स्थानिक भाजी विक्रेत्यांनी पालिकेला धडक देत तलावा काठाचा आठवडा बाजार अन्यत्र हलवावा, अशी मागणी केली होती. यातच आज सिंधुदुर्ग जिल्हा हॉकर्स फेडरेशनच्या माध्यमातून फिरत्या विक्रेत्यांनी संघटीत होत पालिकेवर मोर्चा काढला. याचे नेतृत्व हॉकर्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अॅड. निंबाळकर व सेक्रेटरी महेश परुळेकर यांनी केले. यावेळी आणि आपल्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून पालिकेकडे सुपूर्त केल्या.
ॲड. निंबाळकर म्हणाले, ‘‘पालिकेने आपल्या हद्दीतील आठवडा बाजाराची जागा फेरीवाल्यांना विश्वासात न घेता वेळोवेळी बदललेली आहे. वेळोवेळी केलेले नियम व निर्देशाचे पालन फेरीवाले करीत आले आहेत; मात्र, आता पुन्हा एकदा मोती तलावाच्या काठावर भरणाऱ्या आठवडा बाजाराची जागा दुसरीकडे हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; पण, फेरीवाल्यांची म्हणणे आहे की, ‘आठवडा बाजाराची जागा बदलताना बाजू मांडण्याची संधी द्यावी. ही जागा निश्चित करताना बाजारात येणाऱ्या ग्राहकांची सोय त्यांना रिक्षा, बस आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्या ठिकाणी आहे किंवा नाही याचा विचार करून जागा निश्चित करावी. शिवाय आठवडा बाजारामध्ये येणाऱ्या व्यापाऱ्याचा त्या ठिकाणी व्यवसाय होईल का? याचाही विचार केला जावा. सद्यस्थितीत श्रीराम वाचन मंदिर ते शिवराम राजे भोसले अशी असलेली आठवडा बाजाराची जागा फेरीवाले ग्राहक यांना सोयीची आहे. त्यामुळे ही जागा बदलू नये. होळीचा खुंट या ठिकाणी आठवडा बाजाराची जागा निश्चित केल्यास ती गैरसोयीची आहे. त्या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार नाही.’’
यावेळी ‘फेरीवाले एकजुटीचा विजय असो’, ‘हम सब एक है’चा नारा उपस्थित फेरीवाल्यांनी दिला. यामध्ये नाजिम पटेल, राजेंद्र लेंडगे, संदीप गौंड, इरसाद मालदार, सुमन वाडीकर, सुभाष चव्हाण, मालुबाई कांबळे, कृष्णा कांबळे, विजय लोके, प्रकाश पांगरी, श्रीकांत सोलापूरे, विजय गुजराती, लक्ष्मण राठोड, अर्जुन सोलंकी आदी फिरते व्यापारी उपस्थित होते.
--
जिल्ह्यात एकाच दिवशी बाजार नको!
अॅड. निंबाळकर म्हणाले, ‘‘अलीकडेच व्यापारी महासंघाने संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी आठवडा बाजार भरवावा, अशी मागणी केली आहे. या मागणीस आमची सप्त हरकत आहे. फेरीवाले व्यापारी आठवड्याचे सातही दिवस वेगवेगळ्या गावात जाऊन आपला व्यवसाय करतात. आठवड्यातून एकच दिवस आठवडा बाजार झाल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. स्थानिक व्यापारी आणि फेरीवाले असे भांडण कोणी लावून आपली राजकीय पोळी भाजू नये. निवडणुकीला फेरीवालेही मतदान करतात हे सर्वांनी लक्षात ठेवावे.’’