शिमगोत्सवाला हवी पर्यटनाची साथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिमगोत्सवाला हवी पर्यटनाची साथ
शिमगोत्सवाला हवी पर्यटनाची साथ

शिमगोत्सवाला हवी पर्यटनाची साथ

sakal_logo
By

शिमगोत्सव पर्यटन पॅकेज- भाग १ लोगो

rat3p5.jpg
86575
सावर्डेतील होलटा होम.


शिमगोत्सव ठरायला हवा पर्यटकांचे आकर्षण
संस्कृती परंपरेचा ठेवा; विविध पॅकेजीस शक्य
मुझफ्फर खानः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ः जिल्ह्यात ‘शिमगोत्सवा’ला सुरवात झाली आहे. ‘फाल्गुन शुद्ध पंचमी’ला (फाक पंचमी) सुरू होणारा ‘शिमगोत्सव’ त्यापुढील दहा दिवस हुताशनी पौर्णिमेपर्यंत (होळीपर्यंत) साजरा केला जातो. प्रत्येक गावच्या ‘शिमगोत्सवा’चे स्वत:चे असे वेगळेपण आहे. त्याला जर पर्यटन व्यवसायाची जोड मिळाली तर कोकणातील पर्यटनाला तो वेगळा आयाम ठरेल.
सावर्डे (ता. चिपळूण) येथे ‘होलटे होम’ हा खेळ खेळला जातो. या खेळात मानपानाप्रमाणे गावातील दोन गट परस्परांसमोर उभे राहून लाकडे पेटवतात. नंतर ढोलताशाच्या गजरात आरोळ्या ठोकत सुमारे ३० फुटाच्या अंतरावरून ती पेटती लाकडे (होलटे) पाचवेळा एकमेकांवर फेकतात; मात्र ही लाकडे अंगावर पडून कोणीही जखमी वा भाजत नाही. शेवटी उरलेली लाकडे एकत्र करून त्यांची होळी केली जाते. ज्या मैदानात (देवाचा फड) हा खेळ खेळला जातो त्या जागी सकाळी कोळसा अथवा राखेचा लवलेशही आढळून येत नाही. गेली शेकडो वर्षे सुरू असलेला हा रोमांचकारी खेळ अन्य कोठेही साजरा होत नाही.
संगमेश्वर परिसरात ‘शिमगोत्सवा’च्या निमित्ताने साजरा होणारा शिंपणे उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नावीन्यपूर्ण आहे. शिमग्यातील होम प्रज्वलित करून देवीच्या पालख्या घरोघरी जाऊन राजांगणी बसल्या की, साऱ्या संगमेश्वरला शिंपण्याचे वेध लागतात. रंगपंचमी झाल्यावर आकर्षकरितीने सजवलेल्या बैलगाड्यांतून होणारी केवळ शौर्याच्या लाल रंगाची उधळण हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. इतर रंगांना तेथे मज्जाव असतो. या लाल रंगातच आबालवृद्ध अक्षरश: मनसोक्त डुंबत असतात. आदल्या दिवशी रात्रीपासून सुरू झालेला हा सोहळा दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत अमाप उत्साहात साजरा केला जातो. तेथील देवी जाखमाता आणि देवी निनावी यांच्या मंदिरांमध्ये भक्तांसाठी रात्री मटण भाकरीचा प्रसाद वाटला जातो. त्यासाठी लागणाऱ्या सर्व भाकऱ्या गावांमधील महिला घराघरांमधूनच बनवतात. प्रतिवर्षी जवळपास १५ ते २० हजारांपेक्षा जास्त भाकऱ्या प्रसाद म्हणून वाटल्या जातात. प्रत्येक गावच्या ‘शिमगोत्सवा’चे वेगळेपण आहे. त्याला पर्यटन व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे.

चौकट
खेळे हा वेगळा नृत्यप्रकार
नमन, भारूड, जाखडीनृत्य, दशावतार हे विविध कलाप्रकार, शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली कोकणातील सांस्कृतिक परंपरा आजही टिकवून आहेत. गावागावात होणारे ‘खेळे’ हा सुद्धा त्यातीलच एक वेगळा नृत्यप्रकार आहे; मात्र तो फक्त शिमग्यामध्येच ग्रामदेवतेच्या पालखीबरोबर खेळवला जातो. त्यामुळे त्याला ‘देवीचे खेळे’ असेही म्हटले जाते. या नृत्य प्रकारात एकाच प्रकारचा पोशाख घातलेल्या साधारण आठ ते दहाजणांचा संच असतो. कमरेला साडीपासून बनवलेला घागरा, अंगात शर्ट त्यावर फुलीच्या आकाराचे कापडी पट्टे, डोक्यावर टोपी आणि हातात टिपऱ्यांची जोडी असा तो पोशाख असतो. साथीला मृदुंग, झांज आणि बासरी ही वाद्ये असतात. पालखी ज्या घरी जाईल तेथे ही मंडळी फेर धरून नृत्य करतात. या नृत्य प्रकाराला निश्‍चित अशी कालगणना नाही. चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड या तालुक्यांतील काही गावांमध्येच हा खेळ दिसून येतो. या वेळी काही ठिकाणी मुखवटे धारण केलेले आणि रंगीबेरंगी कपडे घातलेले ‘संकासूर’ नाचवले जातात.

कोट
नाचत नाचत माड होळी आणणे, नमनाचे खेळे, रोंबाट, संकासूर, आंब्याची पाने व विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेली होळी, ढोलताशाच्या गजरात आरोळ्या ठोकत ग्रामदेवतेच्या पालख्या मानकऱ्यांच्या घरी नेणे या साऱ्या नावीन्यपूर्ण चालीरितींचा ''पर्यटकां''ना आकर्षित करण्यासाठी चांगला उपयोग करून घेता येऊ शकतो. गोव्यातील ''कार्निव्हल'' तसेच कर्नाटक सरकारच्या ''कदंब'' आणि ''करावली'' उत्सवांप्रमाणेच कोकणातील ''शिमगोत्सव''ही जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरू शकतो.
- देवराज गरगटे, सावर्डे