
ओल्या काजुगरामध्ये भेसळ
ओल्या काजुगरामध्ये भेसळ
चिपळूण चिंचनाका येथील प्रकार; नफा मिळवण्यासाठी दिशाभूल
चिपळूण, ता. ३ः ओल्या काजुगरामध्ये भेसळ करण्याचा प्रकार चिपळुणात सुरू झाली आहे. नफा मिळवण्यासाठी ग्राहकांची दिशाभूल केली जात असून अनेक महिला भेसळीचे काजूगर विकत आहेत. शहरातील चिंचनाका येथे शुक्रवारी (ता. ३) भेसळ केलेला काजूगर विक्री होत असल्याचे आढळून आले.
काजू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. त्यामुळे अनेकजण काजू नियमितपणे खातात. मार्केटमध्येही सुक्या काजूला आणि ओल्या काजूगराला मोठी मागणी असते. त्यामुळे हंगामाच्या काळात ओला काजूगर उपलब्ध झाला नाही तर भेसळयुक्त काजू विकला जातो. काही दिवसांपूर्वी १५०० रुपये किलो दराने काजूगरची विक्री सुरू होती. २०० ग्राम काजूगर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ३०० रुपये दराने विकला जात होता; आता मात्र हजार रुपये किलो दराने ओल्या काजुगराची विक्री सुरू आहे.
चिपळूण शहरात सध्या अनेक ठिकाणी ओल्या काजुगराची विक्री सुरू आहे. कष्टकरी महिला ओल्या काजुगराची विक्री करत आहेत. या महिलांची स्वतःची काजू बाग नाही मग त्या काजूगर कुठून आणतात? याची चौकशी चिपळूणमधील बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी केली तेव्हा मार्गताम्हाणे येथून चिपळुणात काजूगर विक्रीसाठी आलेल्या एका महिलेने सांगितले, ती रात्री सुक्या बिया पाण्यात भिजण्यासाठी टाकते. सकाळी त्या बिया मऊ होतात. त्या बियांमधील गर वेगळा केला जातो. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून त्या विक्रीसाठी आणल्या जातात. सुक्या बियांपेक्षा ओल्या काजुगरला जास्त मागणी असते. त्यामुळे गेल्या वर्षी सुक्या बिया साठवून ठेवल्या जातात. ओल्या काजुगरचा हंगाम सुरू झाला की, गेल्या वर्षीच्या साठवलेल्या सुक्या बिया पाण्यात भिजवून त्यातील गर काढून त्या विकल्या जातात. त्याही बिया ओल्या काजुगरासारखे वाटतात त्यामुळे यातील दिशाभूल चटकन लक्षात येत नाही.
कोट
ओल्या काजूचा रंग पाहून तो बनावट आहे की असली ते समजते. असली ओल्या काजुगराचा रंग पांढरा तर बनावट काजुगराचा रंग पिवळा असतो. काजूगर खरेदी करताना त्याची गुणवत्ता निश्चितपणे तपासली पाहिजे. असली काजूगर दर्जेदार असतो, तो १ इंच लांब आणि जाड असतो. बनावट काजूच्या आकारात खूप फरक असतो. बाजारात स्थानिक महिला काजूगर कुठून आणतात, हे प्रत्येकवेळी तपासणे शक्य नाही. असली काजूगर खाताना ते दातांना अजिबात चिकटत नाहीत. नकली काजूगर खाल्ले तर ते दातांमध्ये सहज चिकटतात. त्यामुळे ग्राहकांनी खात्री करूनच ओले काजूगर घ्यावेत.
- राजेंद्र पाटील, चिपळूण बागायतदार