
चिपळूण ः बहादूरशेख नाक्यात वाहतूककोंडीने फुटतोय पोलिसांनाही घाम
atchl34.jpg ः
86676
चिपळूण ः बहादूरशेख नाक्यात सातत्याने होणारी वाहतूककोंडी.
चिपळुणात वाहतूककोंडीने पोलिसांनाही घाम
बहादूरशेखमध्ये सर्वाधिक; उड्डाणपूलाच्या कामाने खोळंबा
चिपळूण, ता. ३ः मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणचे शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बहादूरशेख नाक्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत असून वाहनचालकांना तासनतास येथे रखडावे लागत आहे. तरीही वाहतूककोंडी सोडवताना पोलिसांचादेखील अक्षरशः घाम फुटतो आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे आणि कामातील हलगर्जीपणामुळेच हा त्रास सहन करावा लागत असून, महामार्ग ठप्प होण्याच्या घटनादेखील वाढत आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस हे काम सुरू ठेवण्यात आले आहे; परंतु काही ठिकाणी सामान्य नागरिक वाहनचालक व व्यापाऱ्यांना या कामाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. चौपदरीकरणाचे काम करताना स्थानिक नागरिक तसेच वाहतुकीला कोणताच अडथळा येऊ नये. त्यासाठी अगोदरच उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश असताना त्याकडे दुर्लक्ष करून कामाची गती राखण्यावर लक्ष दिले जात असल्याचे अनेक उदाहरणे चिपळूणमध्ये दिसून येत आहेत. बहादूरशेख नाका हा महामार्गावरील सर्वात महत्वाचा टप्पा आहे. या नाक्यावरून कुंभार्ली घाटाकडे तसेच शहरात येण्यासाठी आणि बहादूरशेख मोहल्ला, शंकरवाडी तसेच मुंबईकडे जाताना कळंबस्ते पंधरागावकडे जाण्यासाठी असे मार्ग आहेत. त्यामुळे हा नाका एकप्रकारे चिपळूणमधील जंक्शन ठरला आहे; परंतु याच ठिकाणी आता प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली आहे. दिवसभर होणारी वाहतूककोंडी पोलिस यंत्रणा व वाहनचालकांना घाम फोडत आहे. येथे उड्डाणपूलाचे काम सुरू आहे तर दोन्ही बाजूने सर्विस रोडदेखील तयार करण्यात आले आहे; परंतु मुंबईकडे जाणारा सर्विस रोड अर्धवट सोडून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांची ये-जा एकाच सर्विस रोडवरून होत आहे. महामार्गावर सातत्याने जड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे एखादे मोठे वाहन रस्त्यावर आले तर आजूबाजूची पूर्ण वाहतूक ठप्प पडून वाहतूककोंडी होत आहे. भर उन्हात ही वाहतूककोंडी सोडवताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत.
चौकट
रांगा कळंबस्ते फाट्यापर्यंत
सायंकाळी तर वाहनांच्या लांबचलांब रांगा कळंबस्ते फाट्यापर्यंत तर चिपळूणच्या गुरूकूल कॉलेजपर्यंत लागलेल्या असतात आणि त्यामुळे महामार्ग ठप्प पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झालेली असताना ठेकेदार मात्र याकडे अजिबात लक्ष देण्यास तयार नाही. मुंबईकडे जाणारा सर्विस रोड पूर्ण करून खुला केल्यास ही समस्या निकाली निघेल व वाहनचालक आणि स्थानिकांचा त्रासदेखील कमी होईल; परंतु ठेकेदार कोणत्या कारणास्तव दुर्लक्ष करून आहे, याचे उत्तर सध्यातरी कोणाकडे नाही.