
करवाढीविरोधात सर्वपक्षीयांना हाक
86687
बबन साळगावकर
करवाढीविरोधात सर्वपक्षीयांना हाक
बबन साळगावकर; संबंधितांशी चर्चा
सावंतवाडी, ता. ३ ः येथील पालिकेच्या माध्यमातून वाढविण्यात आलेल्या पाणीपट्टी व घरपट्टी विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र येवून आंदोलन करावे, अशी हाक येथील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. या आंदोलनात शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदींना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने संबंधितांशी आपली चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. साळगावकर यांनी आज याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. यात असे नमुद केले आहे की, वाढीव कराविरोधात शहरातील विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री. साळगावकर यांनी पालिकेच्या करवाढीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रसंगी नागरिकांना घेऊन आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी घेतला आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी प्रांत कार्यालयासमोर घंटानादही केला होता. शहरात बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडूनही यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आले होती. ही करवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर हा विषय तडीस लावण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन मोठा उठाव करण्यासाठी साळगावकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक दळवी, काँग्रेसचे महेंद्र सांगेलकर आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार लवकरच सर्वांशी चर्चा करुन पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे, असे श्री. साळगावकर म्हणाले.