
सिंधुदुर्गनगरीत महिला दिनी कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरीत महिला दिनी कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मुख्यालय, जिल्हा नियोजन समिती जुने सभागृह येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी एक दरम्यान जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता.८) विविध कार्यक्रम आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. बी. म्हालटकर तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम. एस. निकम मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. या जागतिक महिला दिनानिमित्ताने, महिला विषयक कायदे व योजना ‘दक्ष महिला, सक्षम महिला’, या उपयुक्त पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. महिला मेळाव्यामध्ये जिल्हास्तरावरील सर्व प्रशासकीय विभागातील सहभागी होणाऱ्या सर्व महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिला विषयक कायदे, महिलांचे हक्क व संरक्षण या बाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
-------------------
नांदगाववासीयांचे ‘रेल रोको’ स्थगित
नांदगाव ः येथील रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत करावा, यासाठी राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत उद्या (ता.४) रेलरोकोचा इशारा दिला होता. याबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दखल घेऊन याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पत्रव्यवहार केला. पुढील रेल्वे बोर्डाच्या बैठकीत नांदगाव स्टेशनला तुतारी एक्स्प्रेस थांबविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे मंत्री यांच्याकडून मिळाले असल्याने रेलरोको आंदोलन स्थगित केल्याचे आंदोलकाच्यावतीने संतोष राणे, बाबू घाडी, गणेश गुरव, प्रदीप घावरे, रविंद्र सावंत, महेश मोंडकर, मुरलीधर राणे यांनी सांगितले आहे.