गुहागर ः शुन्यापासून महामार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः शुन्यापासून महामार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा
गुहागर ः शुन्यापासून महामार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा

गुहागर ः शुन्यापासून महामार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा

sakal_logo
By

rat३p२६.jpg
८६६७१
गुहागरः महामार्गासंदर्भात तहसीलदार कार्यालयात प्रांतांच्या अध्यक्षतेत बैठक झाली.
---------------
मोबदला मिळण्यापूर्वी महामार्गासाठी जागा
गुहागर तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जागा मालक राजी ; शुन्यापासून कामाचा मार्ग मोकळा

चौकट
दृष्टिक्षेपात...
*एप्रिल २०२२ मध्ये काम रोखले
*प्रांत पवार यांनी घेतली बैठक
*अतिक्रमणाना भरपाई नाही
*कोर्टकेस निकालानंतर मोबदला
*ग्रामस्थांचे सहकार्याचे आश्वासन

गुहागर, ता. ३ ः प्रांत प्रवीण पवार यांच्या विनंतीला मान देऊन मोबदला मिळण्यापूर्वी महामार्गाच्या कामाला जागा देऊ, असे आश्वासन गुहागरमधील जागामालकांनी दिले. त्यामुळे शुन्य किमीपासून न्यायालयापर्यंत अपूर्ण असलेल्या महामार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. महामार्गातील अडचणी दूर करण्यासाठी प्रांत प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर तहसील कार्यालयात शुक्रवारी (ता. ३) बैठक झाली.
भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करताच महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदार गुहागर-विजापूर महामार्गाचे काम करत होते. गुहागर शहराच्या हद्दीतील ग्रामस्थांनी एप्रिल २०२२ मध्ये हे काम रोखले. महामार्गासाठी कोणाची, किती जमीन जाणार, मोबदला किती मिळणार याची माहिती मिळत नाही तोवर महामार्गाचे काम करता येणार नाही, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे गुहागरातील शुन्य कि.मी.पासून न्यायालयापर्यंतचे काम अर्धवट सोडण्यात आले होते.
खासदार सुनील तटकरे यांनी २५ फेब्रुवारीला महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. त्या वेळी गुहागरमध्ये बैठक घेण्याची सूचना दूरध्वनीवरून पवार यांना केली होती. आज पवार यांनी महामार्ग प्राधिकरण, भूमि अभिलेख या विभागांचे अधिकारी आणि ठेकेदाराचे प्रतिनिधी यांच्यासोबत तहसील कार्यालयात बैठक घेतली. बैठकीला नगराध्यक्ष राजेश बेंडल, तहसीलदार प्रतिभा वराळे, मोडकाआगरपर्यंतच्या महामार्गावरील सर्व जागामालक आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये पवार यांनी शुन्य किमीपासून न्यायालयापर्यंतच्या महामार्गाच्या दुतर्फा कोणत्या जमिनी जात आहेत त्याची माहिती नागरिकांना दिली. या वेळी मोबदल्याविषयी शासनाची भूमिका स्पष्ट करताना प्रांत म्हणाले, ज्यांची बांधकामे अतिक्रमण स्वरूपातील आहेत त्यांना कोणताही मोबदला मिळणार नाही. आज काही जागामालकांच्या कोर्टकेस सुरू आहेत. त्यांच्या मोबदल्याचा विषय केसच्या निकालानंतर होईल. उर्वरित जागेमध्ये असलेल्या बांधकामाचा विचार करून महामार्गाने ठरवून दिलेल्या सुत्राप्रमाणे दर निश्चित करून रक्कम जागामालकांच्या खात्यात जमा होईल; मात्र या सर्व प्रक्रियेला अजूनही काही काळ जाईल.
दरम्यान, ज्या नागरिकांची संमती असेल तेथील महामार्गाचे काम सुरू होईल. १४ मेपर्यंत संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीररित्या भूसंपादन केले जाईल. कामाची सुरवात जलवाहिन्या, वीजवाहिन्यांच्या कामाने होईल. या वेळी उपस्थित नागरिकांनी महामार्गाला जोडणारे रस्ते आणि घरांचे रस्ते ठेकेदाराने पुन्हा बांधून द्यावेत. जागा व घराचा जाणारा भाग शासनाने चिन्हांकित करून द्यावा, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली. या दोन्ही मागण्या प्रांतांनी स्वीकारल्या. ठेकेदाराने छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करून द्यावे, अशी विनंती नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केली.

चौकट
पुन्हा मोजणी, पुन्हा अधिसूचना
आजवर झालेल्या रामपूरपर्यंतच्या महामार्गाच्या कामात किती जागामालकांची जमीन गेली आहे हे तपासण्यासाठी भूमिअभिलेखतर्फे पुन्हा मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर अधिसूचनाही प्रसिद्ध केली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण करून महामार्गात जमीन गेलेल्यांना त्यांचा मोबदला दिला जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.