
चिपळूण - गाळ काढण्यासाठी नव्याने निधीची तरतूद नाही
वाशिष्ठी नदीतील जलसंपदाच्या
टप्पा दोनमधील गाळ उपसा ठप्प
नव्याने निधी नाही; शहराला प्राधान्य ग्रामीणकडे दुर्लक्ष
चिपळूण, ता. ३ ः नाम फाउंडेशनच्या माध्यमातून वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा केला जात आहे. नाम फाउंडेशनला निधी कमी पडू नये यासाठी जलसंपदा विभागाचे सुरू असलेले टप्पा दोनमधील काम थांबवण्यात आले आहे. राज्य सरकारकडून गाळ उपसा करण्यासाठी नव्याने निधीची तरतूद केली नाही. त्यामुळे उपलब्ध निधीतून पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जलसंपदा विभागाने वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा कामासाठी तीन टप्पे तयार केले आहेत. गतवर्षीच्या पावसामुळे वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाचे काम काही ठिकाणी थांबले होते. पावसाळ्यानंतर पहिल्या टप्प्यातील उर्वरित, तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरवात झाली होती. पहिल्या टप्प्यात ८.१० दशलक्ष घनमीटर गाळ काढून झाला आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या १० कोटी निधीपैकी ६ कोटी खर्च झाला आहे, तर ४ कोटी रुपये शिल्लक आहेत. पावसाळ्यानंतर संथगतीने गाळ काढण्याचे काम होत असल्याने चिपळूण बचाव समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक झाली. त्या बैठकीत पहिल्या टप्प्यातील शिल्लक गाळ काढण्याची जबाबदारी नाम फाउंडेशनकडे देण्यात आली. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ज्या ठिकाणी पूर येतो, त्या भागातील नद्या व खाड्यांमधील गाळ काढताना शासनाने रॉयल्टी माफ केली आहे. त्यामुळे नदीतील गाळ मोफत काढण्यासाठी स्थानिक वाळू व्यावसायिक तयार होते. त्यांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले.
जलसंपदा विभागाने गाळ काढण्यासाठी १२५ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नामुळे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी १० कोटी रुपये दिले. सरकार बदलल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चिपळूणसाठी आणखी निधी बैठकीत मंजूर करून घेतील, अशी शक्यता होती. तसे न घडता नाम फाउंडेशनला शिल्लक राहिलेला गाळ काढण्याचे काम देण्यात आले. नाम फाउंडेशनचे ८ पोकलेन व १५ टिप्पर, एक ४५ मीटरचा लाँग रिच बूम दाखल झाला. या यंत्रणेच्या साहाय्याने शहरातील पेठमाप भाटण, बाजारपूल गणेश विसर्जन घाट, उक्ताड व गोवळकोट धक्का येथे १५ दिवस गाळ उपशाचे काम सुरू आहे.
उक्ताड जुवाड बेट येथे २ पोकलेन, पेठमाप २ व बाजारपूल येथे १ पोकलेन आणि जेसीबीने काम सुरू आहे. जलसंपदा विभागाला दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम दिले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाने सती, अलोरे, पिंपळी, शिरगाव आदी ठिकाणी आपली यंत्रणा लावून गाळ काढण्याचे काम सुरू केले होते; मात्र मागील काही दिवसांपासून दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम अचानकपणे बंद केले आहे. गाळ काढण्यासाठी नव्याने निधी मंजूर झालेला नाही. उपलब्ध निधीतून गाळ काढताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाचे काम थांबण्यात आले आहे.
-------
कोट
दुसऱ्या टप्प्यात गाळ काढण्याचे सुरू असलेले काम आम्हाला वरिष्ठांकडून थांबवण्याचे आदेश आले. त्यानंतर आम्ही काम थांबवले आहे. काम थांबवण्याचे कारण आम्हाला माहीत नाही. आदेश येतील तेव्हा आम्ही काम सुरू करू.
- विपुल खोत, उपअभियंता पाटबंधारे विभाग, कापसाळ