
ःब्रेक निकामी झाल्याने आंजणारीत ट्रक उलटला
rat०३३८.txt
बातमी क्र. ३८ ( पान ३ साठी)
आंजणारीत ट्रक उलटला
अडकलेल्या मालकाची तासाने सुटका ; ब्रेर निकामी झाल्याने घडली घटना
लांजा, ता. ३ ः मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथे पहाटे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक उलटला. या अपघातात मालक ट्रकखाली अडकून पडला होता. लांजा पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर व जेसीबीच्या साहाय्याने ट्रक बाजूला करून जखमी मालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राजेशभाई भिकाबाई सोळंकी (रा. गुजरात) हे ट्रक घेऊन अहमदाबाद ते गोवा असे प्रवास करत होते. शुक्रवारी पहाटे हा ट्रक राजेशभाई सोळंकी यांचा मुलगा चालवत होता. राजेशभाई सोळंकी हे ट्रकमध्ये पाठीमागे प्लायवर जाऊन झोपले होते. पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी घाटातील तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे तो त्याच ठिकाणी उलटला. ट्रकच्या पाठीमागे प्लायवर झोपलेले मालक राजेशभाई सोळंकी हे ट्रकखाली अडकून पडले होते. अंगावर प्लाय पडल्यामुळे त्यांना जागचे हलता येत नव्हते. याबाबतची माहिती लांजा पोलिसांना मिळाल्यानंतर लांजा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव तसेच कॉन्स्टेबल वळवी हे सव्वासहा वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ट्रकखाली अडकून पडलेल्या सोळंकी यांना बाहेर काढण्यासाठी या दोघांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर येथील जेसीबी मागवण्यात आला. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर अडकून पडलेल्या मालक सोळंकी यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना पाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस जाधव आणि वळवी यांच्या प्रयत्नामुळेच राजेशभाई सोळंकी यांचे प्राण वाचले आहेत. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या कामी मदत केली. या अपघातादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे देखील घटनास्थळी जाऊन त्यांनी घटनेची पाहणी केली.
--