‘गुरुजीं’चे राजकारण आता तापणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गुरुजीं’चे राजकारण आता तापणार
‘गुरुजीं’चे राजकारण आता तापणार

‘गुरुजीं’चे राजकारण आता तापणार

sakal_logo
By

29917

‘गुरुजीं’चे राजकारण आता तापणार

शिक्षक पतपेढी निवडणूक; प्रारूप यादी प्रसिद्ध, २९८२ मतदार निश्चित

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील गुरुजींचे राजकारण आता तापणार आहे. प्राथमिक शिक्षकांची सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक घेण्याची पूर्वतयारी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक विभागाने सुरू केली आहे. २ फेब्रुवारीला याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. २ हजार ९८२ एवढे मतदार प्रारूप यादीत निश्चित झाले असून २७ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्ह्यात सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी या संस्थेची पंचवार्षिक मुदत यापूर्वीच संपली आहे. परंतु, नियमित कालावधीत निवडणुका होऊ न शकल्याने राज्याने विद्यमान संचालकांना मुदतवाढ दिली आहे. मात्र, आता राज्याच्या सहकार विभागाने या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक घेण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने त्या दुष्टिने पूर्वतयारी सुरू केली आहे. यातील पहिला टप्पा प्रारूप मतदार यादी जाहीर करण्याचा असतो. त्यानुसार २ मार्चला प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या पतसंस्थेसाठी एकूण १५ संचालक निवडून दिले जाणार आहेत. यात आठ तालुक्यांचे आठ मतदार संघ असणार आहेत. दोन जिल्हा सर्वसाधारण मतदारसंघ राहणार आहेत. महिला प्रतिनिधी यांच्यासाठी दोन जागा राखीव आहेत. याशिवाय अनुसूचित जाती-जमाती एक जागा, इतर मागास प्रवर्ग एक जागा, भटक्या जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग एक जागा असे एकूण पंधरा संचालक निवडले जाणार आहेत. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक भारती अशा अनेक संघटना जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या कार्यरत आहेत. याशिवाय मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक यांच्याही संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे या निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? याकडे जिल्ह्यातील हजारो प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
--------------
चौकट
एप्रिलमध्ये निवडणूक शक्य
प्रारूप मतदार यादी २ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर आक्षेप घेण्यासाठी २ ते १३ मार्च हा कालावधी ठेवण्यात आला आहे. या हरकती पतसंस्थेच्या तालुका शाखा कार्यालय अथवा सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालयात नोंदविता येणार आहेत. दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय घेण्यासाठी २३ मार्च ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर २७ मार्च ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील दहा ते १५ दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात या पतसंस्थेचे निवडणूक बिगुल वाजणार आहे.
-----------
चौकट
पाच कर्मचारी पतसंस्थेच्या याद्या
जिल्ह्यातील सिंधू बँक स्टाफ सोसायटी, सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य (मलेरिया) कर्मचारी सहकारी पतसंस्था, वीज मंडळ वर्कर्स फेडरेशन सहकारी पतसंस्था या अन्य पाच सहकारी पतसंस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. १३ मार्चपर्यंत या याद्यांवर आक्षेप घेण्याचे मुदत आहे. २३ मार्चपर्यंत आक्षेपावर निर्णय दिला जाणार आहे. २७ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
-------------
चौकट
२२ सभासद वगळले
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेची प्रारूप मतदार यादी तयार करताना एकूण २२ सभासद वगळण्यात आले आहेत. वगळण्यात आलेल्या सभासदांत मयत आणि सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे.
--------------
प्रारूप मतदार यादी तालुकानिहाय
सावंतवाडी*५०४
वेंगुर्ले*२७२
मालवण*३८७
देवगड*३५१
कणकवली*५३७
कुडाळ*५३१
वैभववाडी*२१०
दोडामार्ग*१९०